राजापूर तालुक्याच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमातून तालुक्याच्या पर्यटनाला एक निश्चित दिशा मिळत आहे.
राजापूर- राजापूर तालुक्याच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमातून तालुक्याच्या पर्यटनाला एक निश्चित दिशा मिळत आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून तालुक्यातील पर्यटनस्थळांची इत्यंभुत माहिती जगभरातील पर्यटकांना सहजगत्या उपलब्ध व्हावी याकरता फेसबुकवर ‘राजापूर पर्यटन’ या नावाने अकांऊट उघडण्यात आले आहे.
शिवाय सरकारच्या http://ratnagiri.nic.in/rajapur या अधिकृत वेबसाईटवरही राजापूरच्या पर्यटनाची सविस्तर माहिती अपलोड केली जाणार आहे. याचीही सुरुवात लवकरच करण्यात येणार असून त्यामुळे एका क्लिकवर राजापुरातील पर्यटनाची माहिती पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून जगभरातील पर्यटकांना राजापूर तालुक्यातील पर्यटनस्थळांची माहिती सहजरीत्या उपलब्ध होणार असून राजापूरच्या पर्यटनाची ख्याती जगभर पोहोचणार आहे.
कोकणाला निसर्गसौंदर्याचे भरभरून वरदहस्त लाभले आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यावर काकणभर जास्तच कृपादृष्टी लाभली आहे. या ठिकाणची धार्मिक स्थळे ही निसर्गाच्या कुशीत वृक्षराजीत, डोंगरकपारीत, सागरसान्निध्यात वसली आहेत.
एवढे सारे निसर्गदत्त असताना शाश्वत विकासापासून दूर राहिलेल्या राजापूर तालुक्याला पर्यटनदृष्टया ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी पुढाकार घेत विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
त्यामध्ये ‘नवदुर्गा दर्शन सहल सोहळा’, छायाचित्र प्रदर्शन, पर्यटन महोत्सव यातून तालुक्याच्या पर्यटनाची नव्याने ओळख करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याला मित्रमेळा, माय राजापूर या स्थानिक संस्थांची सक्रिय सहभागाची जोड मिळाली आहे.
राजापूर तालुक्यातील विलोभनीय समुद्रकिनारे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे, हिरवीगार वनराई, पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू त्यांची स्थापत्यकला, इथले लोकजीवन या साऱ्याच गोष्टी पर्यटनाला पूरक आहेत.
श्री धूतपापेश्वर, अणसुरेचा गिरेश्वर, रायपाटणचे संगनाथेश्वर, येरडवचे गांगो त्याचबरोबर कशेळीचा कनकादित्य, देवाचे-गोठणेचे भार्गवराम मंदिर, केळवलीचे श्री नृसिंह मंदिर अशा अनेक शिवस्थानांचा महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारचे औचित्य साधून पर्यटन सहलींचा विचार झाल्यास त्याला मिळणारा प्रतिसाद हा तालुक्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
त्याचबरोबर पावसाळी पर्यटन म्हणून डोंगरद-या, ओसंडून वाहणारे धबधबे ज्याची प्रत्यक्ष ओळख तालुकावासीयांनाही झालेली नाही, असा चुनाकोळवणचा धबधबा, धोपेश्वर धबधबा. असे अनेक धबधबे पर्यटकांच्या मनाचा ठाव घेऊ शकतात. राजापूर तालुक्यात जशा नैसर्गिक सौंदर्याच्या गोष्टी आहेत अशा अनेक अगम्य गोष्टीही आहेत.
गंगातीर्थ, उन्हाळे उष्णोदक, कातळशिल्पे, इतिहासकालीन वास्तू, यात्रा, सण उत्सवातील परंपरा, त्यातील अगम्यता, गुढता यांची नव्याने ओळख नव्या पिढीला होऊ शकेल. ही सर्व माहिती या फेसबुक पेजच्या माध्यमातून जगासमोर उपलब्ध झाली आहे.
पर्यटनातून विकासाची वाटचाल करायची तर त्यासाठी पर्यटनपूरक मानसिकता ही आपली अपरिहार्यता असायला हवी. त्यासाठी सरकारीस्तरावर प्रांताधिकारी खांडेकर यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल. या माध्यमातून राज्य आणि देशपातळीवरील पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकांना राजापुरातील पर्यटनाची ओळख होईल आणि त्यातून पर्यटन विकासाला चालना मिळेल.