अंमलबजावणी संचलनालयानेही माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे घालण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छापासत्रानंतर आता अंमलबजावणी संचलनालयानेही माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे घालण्यास सुरुवात केली आहे.
अंमलबजावणी संचलनालयाने भुजबळांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणीछापे घालण्यात येत आहेत. संपूर्ण दिवसभर हे छापासत्र सुरु राहणार असल्याची माहिती संचलनालयाच्या अधिका-यांनी दिली.
गेल्या आठवड्यात संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत भुजबळांविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिनामधील जमीन बेकादेशीररित्या हस्तांतरित केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता तर नवी मुंबईतील गृहप्रकल्पाप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळांच्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे येथील मालमत्तेवर छापे टाकले. याप्रकरणी १८ जूनला मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तपास पूर्ण करुन दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.