एस. टी. महामंडळातर्फे कर्मचा-यांबरोबरच प्रवाशांच्याही आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन हे महामंडळ प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत आहे.
विजयदुर्ग- एस. टी. महामंडळातर्फे कर्मचा-यांबरोबरच प्रवाशांच्याही आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन हे महामंडळ प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत आहे. त्यामुळे प्रवाशांनीही खासगी वाहतुकीकडे दुर्लक्ष करून एस. टी. महामंडळाचा विचार करावा असं आवाहन विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गंभीर यांनी विजयदुर्ग येथे केले.
एस. टी. महामंडळाच्या परिवहन दिनानिमित्त अर्थात ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरम्यान, एस. टी. महामंडळाने विविध शिबिरांचे आयोजन करावे.
यासंदर्भात पोलिसांची काही मदत लागल्यास आपण कधीही सहकार्याचा हात देऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश गोखले, पेंढरी उपसरपंच मेस्त्री, आगार प्रमुख हरेश चव्हाण, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एस. एस. डोंगरे, लिपिक श्री. पवार, कामगार संघटना प्रतिनिधी महेश इस्वलकर, ए. एस. ठाकरे आदी उपस्थित होते.
परिवहन दिनानिमित्त एस. टी. आगार तसेच सजावट करण्यात आली होती. दरम्यान, विजयदुर्ग एस. टी. आगारप्रमुख हरेश चव्हाण यांनी सांगितले की, कर्मचा-यांच्या उत्कृष्ट कामामुळेच आज एस. टी. महामंडळ यशस्वी वाटचाल करत आहे.
विजयदुर्ग आगाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास येथील प्रत्येक कर्मचा-याने एस. टी. हे आपलं कुटुंबच आहे यादृष्टीने काम केले. त्यामुळेच टक्केवारीत विजयदुर्ग एस. टी. आगार महाराष्ट्रात आठवा तर भारमान व डिझेल बचतमध्ये सिंधुदुर्ग विभागात विजयदुर्ग आगार प्रथम क्रमांकावर आहे. आपण काम करतो ते आगार अर्थात एस. टी. महामंडळ भरभराटीस येण्यासाठी प्रत्येक कर्मचा-याने योगदान दिलं तर महाराष्ट्रात हे महामंडळ पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वासही हरेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
यावेळी पेंढरी उपसरपंच मेस्त्री यांनीही आपल्या भागात विजयदुर्ग आगाराने चांगली सुविधा निर्माण केल्याचा ऊहापोह केला. दरम्यान, या कार्यक्रमाचे औचित्य साधून उत्कृष्ट काम केलेल्या कमर्चा-यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कार्यशाळेमध्ये सहाय्यक कारागीर पी. व्ही. डोंगरे व जे. जे. धुरी तसेच उत्कृष्ट चालक व्ही. डी. शिरसाट, आर. आर. वारकरी, उत्कृष्ट वाहक के. एम. खाडे व एस. आर. राघव यांचा समावेश होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संदीप लोंबर यांनी केले होते.