राज्य विधिमंडळ अधिवेशनासाठी प्रश्न, लक्षवेधी व इतर कामकाजासाठी संपूर्ण ऑनलाईन पद्धत सुरू करणारे राज्य विधानमंडळ देशातले पहिले विधानमंडळ ठरल्याची माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली.
नागपूर- राज्य विधिमंडळ अधिवेशनासाठी प्रश्न, लक्षवेधी व इतर कामकाजासाठी संपूर्ण ऑनलाईन पद्धत सुरू करणारे राज्य विधानमंडळ देशातले पहिले विधानमंडळ ठरल्याची माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली.
लोकसभेत ही पद्धत सुरू करण्याआधी महाराष्ट्र विधानमंडळात ही पद्धत सुरू केल्याचे कळसे यांनी सांगितले. अधिवेशनात वृत्त संकलनासाठी आलेल्या पत्रकाराच्या ‘सुयोग’ निवासस्थानी बोलताना कळसे यांनी ही माहिती दिली.
सध्या सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आठ वैधनिक आयुधांसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली. यात प्रथम १० हजार ५७३ प्रश्न विचारले असून त्यापैकी ३३ टक्के प्रश्न व लक्षवेधी दोन्ही सभागृहांसाठी ऑनलाईन पद्धतीने विचारण्यात आल्या आहेत. २ हजार ६४ पैकी ८१९ लक्षवेधी ऑनलाईन पद्धतीने विचारण्यात आल्या तर ६०७ ठरावांपैकी १५७ ठराव हे ऑनलाईने विचारण्यात आले.
सोबत २१७ अर्धा तास चर्चा आल्या असून ६७ चर्चा या ऑनलाईन आहेत. तर ३ हजार प्रश्न ऑनलाईन विचारण्यात आले आहेत. दुसरीकडे विधान परिषदेतही ३ हजार ४३२ प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यात २०८ प्रश्न ऑनलाईन तर ३५० लक्षवेधींपैकी २० लक्षवेधी व केवळ सहा अर्धा तास चर्चा या ऑनलाईन विचारण्यात आल्या आहेत.
दोन्ही सभागृहांचे प्रमाण पाहता विधिमंडळाच्या पहिल्याच प्रयत्नात चांगले यश आले. यापुढे सर्वच काम हे ऑनलाईन पद्धतीने करण्याचा मानस असल्याचे प्रधान सचिव कळसे यांनी सांगितले.