पुणे-बंगळूरु महामार्गावर खंबाटकी घाटात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जीपवर कंटेनर पडून झालेल्या अपघातात जीपमधील नऊ जण जागीच ठार झाले.
पुणे- पुणे-बंगळूरु महामार्गावर खंबाटकी घाटात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जीपवर कंटेनर पडून झालेल्या अपघातात जीपमधील नऊ जण जागीच ठार झाले. तर पाच जण जबर जखमी झाले. जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात एवढा भीषण होता की, कंटेनर कोसळल्याने जीप पूर्ण चपटी झाली आहे. ही जीप एका वृत्तपत्राची ‘पार्सल टॅक्सी’ होती.
साता-याकडून पुण्याकडे जाणा-या ट्रॅक्स क्रूझरच्या मागून एक कंटेनर येत होता. खंबाटकी घाटातील बोगद्यानंतरच्या बेंगरुडवाडी गावाजवळच्या ‘एस’ वळणावर कंटेनरला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना कंटेनर जीपवर पडला. या भीषण अपघातात क्रूझरमधील नऊ जण चेंगरून मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये एका लहानग्याचाही समावेश आहे. क्रूझरमध्ये एकूण सतरा जण होते. कऱ्हाड तालुक्यातील पाल येथील खंडोबाची यात्रा उरकून पुण्याकडे जायला निघालेले भाविक या गाडीत बसले होते. क्रूझर जीप कोल्हापूरहून पुण्याकडे (दापोडी) निघाली होती. जखमींना तातडीने शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात मिथुन सदानंद कांबळे (रा. शेबाळ, गडिहग्लज, कोल्हापूर), नितीन शिवाजी डपळे (रा. माले, हातकणंगले), धर्माण्णा विठ्ठल वनमराठे (रा. शंख, जत, सांगली), शंकर केशव पवार (रा. गोटील, पाटण), मयुर दादासो जगदाळे (रा. मलकापूर, कराड), पिंटू रामचंद्र चव्हाण (रा. दापोडी, पुणे), समर्थ पिंटू चव्हाण (रा. दापोडी, पुणे), संतोष शामराव कापसे (रा. गडिहग्लज), संगीता शशिकांत माळी (रा. नेल्रे, सांगली) या नऊ जणांचा मृत्यू झाला.
‘एस’ आकाराचे अपघाती वळण
साता-याकडून पुण्याकडे जाणारा रस्ता नव्या खंबाटकी बोगद्यातून जातो. तेथून पुढे गेल्यावर उतारावर अनेक धोकादायक वळणे आहेत. खंबाटकी घाटाच्या पुढील बेंगरुडवाडीजवळील या वळणावर याआधीही अनेक दुर्घटना घडल्या आहेत. बोगदा सोडल्यानंतर तीव्र उतार असल्याने वाहने वेगाने पुढे जात असतात. येथील ’एस’ आकाराचे हे वळण उतारावरच असल्याने वाहनांवर नियंत्रण ठेवणे अवघड होते.