काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे बुधवारी सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील प्रायमस रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
गुरुदास कामत मंगळवारी दिल्लीत अहमद पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेले होते. पटेल यांना भेटून सायंकाळी ते हॉटेलमध्ये मुक्कामाला गेले. मध्यरात्री त्यांना हार्ट अटॅक आला. तेथून त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फार जवळचे सहकारी होते. काँग्रेसने त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दिव दमन या राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्याच वर्षी त्यांनी मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.
गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. मुंबईत चेंबूर येथे त्यांचे बराच काळ वास्तव्य होते. पेशाने वकील असलेले कामत यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून लॉची पदवी मिळवली.
१९७२ मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर १९७६ ला त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपदही भूषवले. १९८० मध्ये महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या सरचिटणीस पदी कामत यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १९८४ मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९८४ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. कामत मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून २००९ मध्ये निवडून आले होते. तत्पूर्वी ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ मध्येही निवडून गेले होते. २००९ ते २०११ मध्ये यूपीए सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखाते आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता.
२००३ मध्ये कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. २००८ पर्यंत ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. २०१३ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांकडून त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जावून कामत यांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून कामत यांना श्रद्धांजली अर्पण केली.
लढवय्या नेता हरपला- खा. नारायण राणे
माजी खासदार, माजी केंद्रीय राज्य मंत्री श्रीयुत गुरुदास कामत यांच्या निधनाचे वृत्त समजले. ते ऐकून अत्यंत दु:ख झाले. गुरुदास कामत हे आमच्या चेंबूर भागातील लढवय्ये नेते होते. या भागातून अनेक वर्षे ते खासदार म्हणून निवडून जात होते. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. काँग्रेसमध्ये अनेक पदावर काम करीत असताना पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. ते माझे जवळचे मित्र होते. काँग्रेसमध्ये असताना आमच्या अनेक बैठक होत असत. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी त्याचे स्नेहाचे संबंध होते. एक आक्रमक आणि लढवय्या नेता अशी त्यांची प्रतिमा होती. ते जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा आहे. त्यांना जे दु:ख झाले आहे, ते सहन करण्याची शक्ती त्यांना परमेश्वराने द्यावी, अशी मी प्रार्थना करतो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी श्रद्धांजली वाहिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे शेवटचे ट्विट
मंगळवारी रात्री गुरुदास कामत यांनी ट्विटरवरुन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचे हे ट्विट अखेरचे ठरले आहे. ‘ईद-उल-अज्हा-मुबारक’ असे ट्विट करत गुरुदास कामत यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काही तासांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
#EidMubarak to all my friends celebrating #EidAlAdha . May all your prayers be accepted. May peace, joy and happiness never depart from your lives and homes.
Happy celebrations! #ईद_उल_अजहा के पुरमुस्सर्रत मौके पर आप सभी को तहे दिल से मुबारकबाद। #ईद_मुबारक pic.twitter.com/WfXX4dc6k9— Gurudas Kamat (@KamatGurudas) August 21, 2018