परळमधल्या १७ मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून या आगीच्या धुरात आठ जण गुदमरल्यामुळे त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई – परळमधल्या १७ मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून २५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर या आगीच्या धुरात आठ जण गुदमरल्यामुळे त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही आग सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लागली. अग्निशामक दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, इमारतीत अग्निरोधक यंत्रणा नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. बाराव्या आणि तेराव्या मजल्यावर आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. १७ मजल्याचा या टॉवर मधील दोन मजले हे पार्किंगसाठी आहेत. मृतांमध्ये एक वृद्ध महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
मुलीच्या प्रसंगावधानाने कुटुंबीयांची सुटका
इमारतीला लागलेल्या आगीनंतर एका मुलीने प्रसंगावधान राखत आगीतून बाहेर पडण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र दाखवले आणि आपल्या कुटुंबीयांची सुटका केली. दहा वर्षांच्या झेन सदावर्तेने घरातील कपडे जमवून फाडले आणि ओले केले. ओले कपडे नाकाशी धरुन श्वासोच्छवास करण्याचा सल्ला तिने कुटुंबीय आणि शेजा-यांना दिला. त्यामुळे आगीनंतर धुराचे साम्राज्य पसरलेले असतानाही श्वास गुदमरत नाही. कपड्यात धुरातील कार्बन शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो.