राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा येण्यापूर्वीच पक्षामध्ये विरोधी आवाज उमटू लागला आहे.
मुंबई- राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा येण्यापूर्वीच पक्षामध्ये विरोधी आवाज उमटू लागला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेताना ‘ते इलेक्टेड नव्हे, तर सिलेक्टेड अध्यक्ष’ होणार आहेत, असा आरोप केला आहे. शिवाय पक्षात घराणेशाही असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी केवळ निवड होणार आहे. याला निवडणूक म्हणता येणार नाही. या निवडणुकीत मतदान करणा-या प्रतिनिधींचे मत आधीच फिक्स झाले आहे. राहुल यांना निवडून आणण्यासाठीच या प्रतिनिधींच्या ठराविक पदांवर नियुक्त्या झाल्या असल्याचा आरोप शहजाद पूनावाला यांनी केला. असे आरोप करण्यासाठी हिंमत लागते. या आरोपांनंतर माझ्यावर हल्ले होऊ शकतात. पण मी सत्य तेच बोलत आहे. पक्षामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पद मिळायला हवे, असेही पुनावाला यांनी सांगितले.
राहुल गांधींवरील आरोपांमुळे पूनावाला भावंडांचे नाते मात्र अडचणीत आले आहे. शहजाद यांचे बंधू तहसीन यांनी आपल्या भावासोबतचे नाते तोडले आहे.
शहजाद यांच्यावर तोफ डागताना राहुल यांच्यावर शहजाद यांनी केलेली टीका अत्यंत खेदजनक असल्याचे तहसीन पूनावाला यांनी म्हटले आहे. शहजादच्या आरोपांमुळे आपण व्यथित झाल्याचे तहसीन यांनी सांगितले. शिवाय आजपासून आपण शहजादशी भाऊ म्हणून असलेले नाते तोडत असल्याचेही त्यांनी ट्विटरवरुन जाहीर केले. तहसीन पूनावाला काँग्रेसचे समर्थक असून ते रॉबर्ट वाड्रा यांचे मेहुणेही आहेत.
दरम्यान, काँग्रेसने एक परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहे. यात म्हटले आहे की, शहजाद पूनावाला मागच्या समितीत होते. यावेळी जी समिती स्थापना झाली आहे, त्यात ते नाहीत. इतकेच नाही तर यावेळी ते काँग्रेसचे सदस्यही बनलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य गांभिर्याने घेऊ नये.