केदारनाथ मंदिर परिसरातील शोध मोहिम आणि बचावकार्य पूर्ण झाले असूनजंगलात अडकलेल्या सर्व यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
सोन प्रयाग- केदारनाथ मंदिर परिसरातील शोध मोहिम आणि बचावकार्य पूर्ण झाले आहे. केदारनाथ मंदिर आणि त्याला लागून असलेल्या जंगलात अडकलेल्या सर्व यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गुप्तकाशीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोन प्रयागमध्ये फक्त एनडीआरएफचे (नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स) अधिकारी आहेत, अशी माहिती रूद्र प्रयागमधील बचाव मोहिचे विभागीय अधिकारी रवीनाथ रामन यांनी दिली. तर रामबाडा, गौरीकुंड आणि केदारनाथमधील पथके रात्री परततील असे, असे ते म्हणाले.
सोन आणि मंदाकिनी नदी किनारी असलेली घरे, हॉटेल, दुकाने उद्ध्वस्त झाली असून तेथे आता ओसाड, दगडधोंडे, माती आणि खडकाळ जमिन दिसत आहे. सोन व मंदाकिनी या नद्यांच्या संगामाजवळ असलेली सर्व उपहारगृहे, घरे, दुकाने व अन्य इमारती नष्ट झाल्या आहेत.
एनडीआरएफच्या जवानांनी तोंडाला मास्क लावून संपूर्ण परिसर पिंजून काढला. येथील विविध भागात मृतदेह कुजल्याने त्यांना हलवणे अशक्य आहे. त्यामुळे मृतदेहांवर आहे त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असेही रामन यांनी सांगितले. परंतू सतत पाऊस पडत असून खराब हवामानामुळे अंत्यसंस्कार करणेही कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांचा आकडा एक हजारावर पोहचला आहे.
उत्तराखंड महाजलप्रलयानंतर भारतीय सैन्य आणि हवाई दलाचे जवान दिवस-रात्र बचाव कार्यात कार्यरत होते. लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या परतण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सरकारी अधिका-यांनी दिली.