सोळाव्या लोकसभेच्या सभापतीपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.
नवी दिल्ली – सोळाव्या लोकसभेच्या सभापतीपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभापतीपदासाठी सुमित्रा महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय खासदारांनी एकसूरात पाठिंबा दिला.
लोकसभेच्या सभापतीपदासाठी सुमित्रा महाजन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड केवळ औपचारिकता होती. सुमित्रा महाजन या मूळच्या कोकणच्या असून, चिपळूण ही त्यांची जन्मभूमी तर, इंदूर कर्मभूमी आहे.
सुमित्रा महाजन यांच्या रुपाने चौथ्यांदा मराठी माणसाला लोकसभेच्या सभापतीपदाचा मान मिळाला आहे. यापूर्वी गणेश मावळकर, शिवराज पाटील आणि मनोहर जोशी यांनी लोकसभेचे सभापतीपद भूषवले आहे.
त्याचबरोबर मीरा कुमार यांच्यानंतर सुमित्रा महाजन या लोकसभेच्या दुस-या महिला सभापती आहेत. त्या मध्यप्रदेशातील इंदूरमधुन सलग आठवेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. १९८९ पासून त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही. यंदा त्यांनी आठव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली. या निवडणूकीत त्यांनी ४.६७ लाख मताधिक्यांनी विजय मिळवला. १९९९ ते २००४ या अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवले आहे.
लोकसभेच्या सभापतीपदी निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे अभिनंदन केले. लोकसभेच्या सभापतीची एकमताने निवड केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीयांचे आभार मानले.