देशातील भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांना आळा घालण्यासाठी सरकारकडून लवकरच सार्वजनिक खरेदीसंबंधी नवा कायदा आणण्यात येणार असल्याचे पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सूतोवाच केले.
अँटालिया- देशातील भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांना आळा घालण्यासाठी सरकारकडून लवकरच सार्वजनिक खरेदीसंबंधी नवा कायदा आणण्यात येणार असल्याचे पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सूतोवाच केले. त्याच वेळी जगभरात ठेवलेला काळापैसा स्वदेशी नेण्यासाठी जागतिक सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बँकिंग व्यवहारांबाबत पाळली जाणारी कमालीची गुप्तता हा काळापैसा शोधून काढण्यातील प्रमुख अडथळा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ टॅक्स इन्फॉर्मेशनवर आधारित कॉमन रिपोर्टिग स्टँडर्डची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून या समस्येवर जागतिक सहकार्याची भावना निर्माण होऊ शकेल, असेही ते म्हणाले. काळापैसा स्वदेशी परत आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जागतिक सहकार्याची आवश्यकता आहे.
बँकिंग क्षेत्रातील अनावश्यक गुप्तता, किचकट कायदे आणि नियमावली ही प्रमुख अडचण असून त्याची सोडवणूक आवश्यक असल्याचे मोदी यांनी तुर्कस्थान येथे सुरू असलेल्या ‘एनहान्सिंग रेझिलन्स’वरील जी-२० परिषदेत ते बोलत होते.
देशातील बेहिशेबी मालमत्तेवर कारवाई करण्यासाठी लवकरच सरकार सार्वजनिक क्षेत्रातील खरेदीसंबंधी नवा कायदा आणणार असल्याचे मोदी म्हणाले. सरकार आणि रिझव्र्ह बँकेकडून वित्तीय आणि बँकिंग क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी पावले उचलली जात असल्याचे ते म्हणाले.