पॅरिसमधील दहशतवादी हल्ला म्हणजे सीरिया आणि इराकमधील अमेरिकेच्या कारवायांना दिलेले प्रत्युत्तर आहे, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते व उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी दिली आहे.
लखनऊ- पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत असतानाच हा हल्ला म्हणजे सीरिया आणि इराकमधील अमेरिकेच्या कारवायांना दिलेले प्रत्युत्तर आहे, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते व उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी दिली आहे. या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होऊ शकतो.
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना खान यांनी अमेरिका, रशिया आणि पाश्चात्य संस्कृतीवर चौफेर टिका करत मध्यपूर्वेतल्या तेलावर हे देश श्रीमंत झाल्याचा जावईशोध लावला. तसेच, त्या अरब देशांमधली मुले उपाशी असताना पाश्चात्य देशात मद्याच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. हा दहशतवादी हल्ला दुर्दैवी असला तरी मुलांची रोजी- रोटी जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याचा हात तोडला पाहिजे, अशी इस्लामची शिकवण असल्याचेही खान यांनी यावेळी सांगितले.
अमेरिका आणि त्यांची पाश्चात्य मित्रराष्ट्रे यांचे पश्चिम आशियातील आर्थिक संबंध हेच सध्याच्या जागतिक संकटाचे मूळ कारण आहे. इराक, सीरिया, लिबिया आणि इराणमधील बेकायदेशीर तेलसाठ्यांतून मिळालेल्या अवैध पैशांतून पॅरिससारखी शहरे उजळायची आहेत का? इराक आणि सीरियात बाँबहल्ले करून तेथील हजारो नागरिक बेघर होत आहेत. त्याचे काय स्पष्टीकरण त्यांच्याकडे आहे? या प्रदेशातील प्रश्न अमेरिका आणि रशिया चिघळवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, आझम खान यांनी अप्रत्यक्षपणे हल्ल्याचे समर्थन केल्याची टीका सुरु होताच माझ्या विधानाचा गैरअर्थ काढल्याची सारवासारव त्यांनी केली आहे. तसेच पाश्चिमात्य देशांनी तेलासाठी इराक, लिबीया, सीरिया आणि अफगाणिस्तान या देशांना आधीच उध्वस्त केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे तुम्हालाही याची संतप्त प्रतिक्रिया सोसावीच लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.