व्यापार म्हटला की खर्च येतोच. खर्चाचा उत्पन्नाशी ताळमेळ न बसल्याने भल्याभल्या उद्योगधंद्यांची भंबेरी उडते. त्यामुळे उद्योगाच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. केवळ नियंत्रणच नव्हे तर उद्योग कंपन्यांना कमीत कमी खर्च करण्यासाठी उद्युक्त करण्याची जबाबदारी ही कॉस्ट अकाउंटंटची असते. उत्पादन करणा-या कंपन्यांमध्ये कॉस्ट अकाउंटंट ठेवणं बंधनकारक असल्यामुळे भविष्यातही या क्षेत्रात संधी उपलब्ध आहे. थोडक्यात कंपनीच्या खर्चावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी याच्यावर असते.
कॉस्ट अकाउंटंट हा उत्पादनाची किंमत ठरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा विचार करतो आणि उत्पादनासाठी येणा-या खर्चावर नियंत्रण ठेवतो. केवळ उत्पादित मालाचीच तो किंमत ठरवतो असं नाही तर सेवेचेही मूल्य ठरवतो. हे मूल्य ठरवण्यासाठी त्याला अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. कच्चा माल, यंत्रावरील खर्च, कामगारांना द्यावं लागणारं वेतन आणि इतर सोयी, कारखान्याची जागा आणि त्यावर उभारलेली स्थावर मालमत्ता, जागेचं द्यावं लागणारे भाडं, कर्जाऊ घेतलेल्या रकमेवर द्यावं लागणारं व्याज, वीज खर्च, विक्रीसाठी केलेला खर्च आणि तद्नंतर सेवेचा खर्च आणि इतर केलेला किरकोळ खर्च या सर्व बाबींचा गुणविशेष लक्षात घेऊन वस्तूंच्या किमती ठरवल्या जातात. शिवाय जे एजंट्स किंवा विक्रेते नेमलेले असतात त्यांना द्यावे लागणारे कमिशन, वाहतुकीसाठी होणारा खर्च यावरही विचार त्याला करावा लागतो. जो कच्चा माल खरेदी केला असतो, त्याच्या किमतीची चिकित्सा, कामगारांना दिलं जाणारं वेतन, यंत्रसामग्रीवरील खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ, मालमत्तेवरील घट इतर खर्चाचा विचार करून उत्पादन आणि प्रबंधन याचा ताळेबंद बसवावा लागतो. कॉस्ट अकाउंटंट यंत्रसामग्रीची क्षमता आणि केलेल्या श्रमांचा समन्वय घडवून किती उत्पादन काढता येईल याचा अंदाज तयार करून तो प्रबंधक किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना सादर करतो. कामाचे निरीक्षण करून कच्चा माल कुठे आणि कसा विनाकारण वापरला जातो, अनाठायी श्रम केले जातात का, इ. गोष्टी हुडकून काढतो आणि तसं होऊ नये म्हणून उपाययोजना सुचवतो. इतकंच नाही तर आर्थिक व्यवहारातील दोष काढून ते दूर कसे करता येईल यावर उपाय सुचवतो. भविष्यातील किंमत आणि वार्षिक आढावा याचं प्रमाण कसं असायला हवं, यासाठी मालकाला मदत करतो अािण खर्चावर नियंत्रण कसं ठेवावं याबद्दल मार्गदर्शन करतो. नवीन गुंतवणूक, स्वयंचलित यंत्र, नवीन योजना यावर आधुनिक दृष्टिकोणातून विचार करून प्रबंधकांना उपदेश करतो. प्रत्येक कामगाराला कोणतं, किती काम द्यावं याबद्दलचे प्रमाण निश्चित करतो. कारखान्यातील प्रत्येक विभागावार किती खर्च व्हावा याचं गणित मांडतो. इतर खर्चाची कायम व बदलणारी किंमत यावर लक्ष ठेवून कशावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे आणि कशावर नाही यावरही आपले विचार व्यक्त करतो.
पात्रता
कॉस्ट अकाउंटंट होण्यासाठी बारावी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.
सी.एस, सी.ए. प्रमाणे बारावीनंतर तीन वर्षाचा आणि पदवी नंतर वर्षाचा हा कोर्स आहे. सी.एस, सी.ए. प्रमाणे सी. डब्ल्यू. ए हा अभ्यासक्रम व्यावसायिक असतो, ज्यात स्पेशलायझेशन करता येतं.
अभ्यासक्रमाचं स्वरूप
इंटरमिजिएट
ग्रुप १
फायनॅन्शिअल अकाउंटिंग
कायदा
डायरेक्ट कर कायदा
कॉस्ट अकाउंटिंग
ग्रुप २
ऑपरेशन व्यवस्थापन
कॉस्ट व्यवस्थापकीय अकाउंटिंग
इनडायरेक्ट कर
कंपनी अकाउंट
फायनल
कॉस्ट अकाउंटिंग
प्रगत फायनॅन्शिअल व्यवस्थापन
स्ट्रॅटेजिक व्यवस्थापन
कर व्यवस्थापन
परफॉर्मन्स व्यवस्थापन
फायनान्शिअल रिपोर्टिग
कॉस्ट ऑडिट
फायनान्शिअल अॅनालिसिस
संस्था
इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया ही केंद्र प्रशासित संस्था हा कोर्स घेते.
याशिवाय अन्य काही कॉलेजेसमध्ये या विषयाचे प्रशिक्षण दिलं जातं.
सिडनहॅम कॉलेज, चर्चगेट
एन. एम कॉलेज, विलेपार्ले
डी. जी रुपारेल कॉलेज, माटुंगा
आर. जे कॉलेज, घाटकोपर
आय. सी. एल कॉलेज, वाशी
भविष्यातील संधी
एकंदरीत व्यवस्थापनातील आर्थिक निर्णय घेणारे हे क्षेत्र आहे . त्यामुळे प्रत्येक कंपनीला कॉस्ट अकाउंटंटची गरज असतेच, विशेषत: मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणा-या कंपन्यांना कॉस्ट लेखाकारांची आवश्यकता असते. त्यामुळे अशा कंपन्यांच्या लेखा विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
याशिवाय स्वयंरोजगारामध्येही पुष्कळ संधी आहेत. नवीन कंपनी कायद्याप्रमाणे इंटर्नल ऑडिटर नेमणं बंधनकारक आहे. त्यामुळे या संधी वाढल्या आहेत.
तर मग उद्योगांना खर्च कमी करण्यास मदत करणा-या या क्षेत्रात करिअर करा.
‘केआयएमआय’च्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कोर्स करण्याची संधी
कोहिनूर इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट(स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट) या भारतातील नामवंत हॉटेल आणि पर्यटन व्यवस्थापन संस्थेने यूजीसी मान्यता प्राप्त तसंच अमेरिकन हॉटेल आणि लॉजिंग या आंतरराष्ट्रीय नामवंत शैक्षणिक संस्थेशी नुकताच एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार तीन वर्षाचा निवासी बी.एसी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज् आणि लॉजिंग सव्र्हिसेस हा कोर्स सुरू केला आहे. तसंच या कोर्सचं मूल्य अधिक वाढवण्यासाठी कोहिनूर इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटने आता कॅनडातील माउंट सेंट व्हिन्सेंट विद्यापीठाबरोबर देखील सहकार्याचा करार केला आहे. हे विद्यापीठ प्रामुख्याने पदवीपूर्व सार्वजनिक विद्यापीठ आहे आणि ते कॅनडातील हॅलिफॅक्स नोव्हा स्कॉशिया येथे स्थित आहे. या माउंट विद्यापीठात एकूण ३८ पदवीपूर्व आणि १३ पदवीधर कार्यक्रम चालवले जातात. संशोधन आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याचं ध्येय साध्य करण्यासाठी कोहिनूर इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट आणि माउंट सेंट व्हिन्सेंट विद्यापीठामधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एक नवीन सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ती म्हणजे फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्रॅम, शैक्षणिक प्रकाशने तसंच संशोधनं यांचं आदानप्रदान होय. पात्र विद्यार्थ्यांना एका विद्यापीठातून दुसरीकडे पदवीपूर्व कार्यक्रमासाठी प्रवेश मिळण्याची संधी मिळू शकते.
योगाभ्यासात करिअर घडवणारा अभ्यासक्रम
योग हा आजच्या जगातील कोणत्याही शारीरिक व मानसिक समस्येवर सर्वोत्तम उपाय आहे. तुम्ही डॉक्टर, वकील, शिक्षक असाल अथवा कोणत्याही क्षेत्रात करिअर करणार असाल तरी योगासनांविषयीची माहिती तुमची जीवनशैली बदलण्यास आणि कामामध्ये सक्षम करण्यास मदत करते. अनादी काळापासून योगशास्त्र हे मानवाच्या अनेक रोगांवरती रामबाण उपाय ठरत आहे. आजच्या धावपळीच्या युगातही आजची तरुण पिढी स्वत:च्या फिटनेसकडे खास लक्ष देते आहे. स्वास्थ्य आणि सुदृढता यांचा समन्वय साधून आजची तरुणाई योग करण्याकडे अधिकाधिक खेचली जात आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात योगामुळे मन, शरीर आणि आत्मा स्वस्थ राहू शकतात. म्हणूनच विद्यार्थ्यांना योगाचा फायदा व्हावा तसंच योगासाठी लागणारं अचूक तंत्र अवगत होऊन सक्षम योग चिकित्सक बनण्यास विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीतर्फे ‘सर्टिफाइड कोर्स इन योगा’ नावाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात डिप्लोमा इन योगिक सायन्स (एक वर्ष), डिप्लोमा इन नॅचरोपथी (एक वर्ष), डिप्लोमा इन नॅचरोपथी हेल्थ आणि ब्यूटी (एक वर्ष), सर्टिफिकेट कोर्स इन न्यूट्रिशन अँड डाएट, सर्टिफिकेट कोर्स इन योगा थेरपी (६ महिने) असे पाच अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमात पुस्तकी आणि प्रात्यक्षिक अशी दोन्ही सत्रं शिकवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना सराव करता यावा यासाठी कॅम्पसमध्ये दोन हॉस्पिटलदेखील सुरू केली आहेत. हा अभ्यासक्रम सर्व वयोगटांतील लोकांना करता येईल. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१४ आहे. अधिक माहितीसाठी ८८९८०१०३३२/ ९८६९३८९८०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.