विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी स्कूल व्हॅन उभ्या ट्रकवर आदळून दोन विद्यार्थी जागीच ठार झाले तर दोन शिक्षकांसह पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.
वर्धा- विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी स्कूल व्हॅन उभ्या ट्रकवर आदळून दोन विद्यार्थी जागीच ठार झाले तर दोन शिक्षकांसह पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी, २३ एप्रिलला सकाळी नऊच्या सुमारास पुलगाव येथील जवाहर टी पॉइंटवर घडला.
देवळी तालुक्याच्या लक्ष्मीनारायणपूर येथील बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षिकांसह सात विद्यार्थी ओमनी कारने शाळेत निघाले होते. पुलगावलगतच्या मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे वरील जवाहर टी पॉइंटवर उभ्या असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून ट्रक आल्याने चालकाचा व्हॅनवरील ताबा सुटला. यामुळे व्हॅन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.
यामध्ये आशय अशोक रामटेके (८), सम्राट प्रफुल्ल काळे (५) हे दोघे विद्यार्थी जागीच ठार झाले. व्हॅनचालक नीलेश तामगाडगे, शिक्षिका रिता ढवळे, नाझिया पठाण यांच्यासह दीया रमेश डोंगरे (७), मयुरी मून (७), आदित्य मुनेश्वर (४) क्षीजिता ताकसांडे (४) व सुनील भगत (७) हे विद्यार्थी जखमी झाले. चालक नीलेश तामगाडगे, शिक्षिका रिता ढवळे, नाझिया पठाण, दीया डोंगरे, मयुरी मून यांना प्राथमिक उपचारानंतर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलवण्यात आले.