महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला उपस्थिती
चिपळूण – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे बुधवारी १ ऑगस्टपासून रत्नागिरीच्या दौ-यावर येत आहेत. दोन दिवसांच्या दौ-यात खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत चिपळूण व रत्नागिरीत पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
बुधवारी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चिपळुणातील कापसाळ येथील माटे सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खासदार नारायण राणे यांची तोफ धडाडणार असून यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तसेच पक्षाचे सरचिटणीस माजी खा. निलेश राणे हेही या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
रत्नागिरीत उद्या कार्यकर्ता मेळावा
गुरुवारी २ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता रत्नागिरीतील हॉटेल विवेकच्या मराठा मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर, शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी केले आहे.