खिडकी.. दरवाजा आणि भिंत यांच्यामधील पारदर्शक भागाला खिडकी असं म्हणतात. या खिडकीमुळेच घरात प्रकाश येतो. अशी ही खिडकी घराचा अविभाज्य भाग असते. घराचा अविभाज्य भाग असलेल्या या खिडकीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. तिची नियमित स्वच्छता केल्यास आणि थोडीशी सजावट केल्यास घराच्या सजावटीतला ती एक आकर्षक भाग ठरत
पूर्वीच्या काळी गावातल्या घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला आठवेल की त्या घरांना एक झरोका होता. गंमत म्हणजे हा झरोका कुठेही भिंतीला नसायचा तर छताला असायचा. आणि हा झरोका म्हणजेच त्यांची खिडकी होती. त्यातून प्रकाश यायचा, मात्र डोकवायला तशी फारशी जागा नसायची. याचा अर्थ त्यांच्या घराला खिडकी नव्हती असं नाही हं. पण ही खिडकी केवळ बाहेरच्या म्हणजे लिव्हिंग रूमलाच असते. त्यामुळे आजकाल गावातही शहरासारखं त्या खिडकीलाही छान रुपडं मिळू लागलं आहे.
अगदी गावाचं कशाला आजकाल शहरातही खिडक्यांचं रूप बदलत आहे. म्हणजे अगदी पूर्वी शहरातल्या घरांनाही पूर्वी खिडकीला गज असायचे. त्यावर जाळीही असायची. मात्र आता ही जाळी नाहीशी झाली आहे.
आता शहरातल्या खिडक्याही मोठया होऊ लागल्या आहेत. कित्येक फ्लॅट्समध्ये तर या विंडोज किंवा खिडक्या आकाराने इतक्याय मोठया झाल्या आहेत की त्यांना दरवाजाचं रूप मिळालं आहे. त्यामुळे त्यांच्या सजावटीकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात झाली आहे. अशा या खिडक्यांची सजावट कशी करायची हे जाणून घेऊ या.
» खिडकी मोठी असो वा लहान त्याला ग्रील लावून घेणं ही आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे तसे ग्रील लावून घ्यावेत. मात्र हे ग्रील लावताना आकाराने मोठे ग्रील लावावेत. म्हणजे त्या ग्रीलमध्ये जास्तीचं सामान ठेवायला मदत होते. तुमच्या घरातलं अतिरिक्त सामान ठेवायला जागा मिळते. घर लहान असेल तर किचनमधली खिडकीही मोठी करावी. म्हणजे सामान ठेवण्यासाठी याचा वापर अधिक चांगला होईल.
» घर टॉप फ्लोअरला असेल तर फ्रेंच विंडो अतिशय छान दिसेल. त्यासोबत फ्रेंच विंडो असेल तर त्याला ग्रील तर करावेच; पण त्याचबरोबर खिडकीला लागून कडप्पा करून घ्यावा. म्हणजे बसायलाही जागा मिळेल. शिवाय त्यात तुम्ही स्टोरेजसाठी कपाटांची व्यवस्थाही करू शकता. म्हणजे वापरायलाही भरपूर जागा मिळेल.
» खिडक्यांची तावदानं बसवताना त्यासाठी एक चौकट मारली जाते. ही चौकट फ्रेमची असते. त्या फ्रेममध्येदेखील विविध रंग असतात. त्यामुळे त्या फ्रेम्सची निवड करताना आपल्या घराचा रंग लक्षात घेऊनच मग त्याची निवड करावी.
» खोलीत खूपच उजेड असेल तर त्या खिडकीला पडद्यांची व्यवस्था करून घ्यावी. फ्रेंच विंडोला पडदे लावणार असाल तर ते वरच्या छतापासून जमिनीपर्यंत लांब असावेत. तरच ते खुलून दिसतात. आजकाल तर या पडद्यांसाठी संपूर्ण सेटच असतो. ज्यात वरच्या बाजूला झालर असते. असे पडदे तुमच्या घराची शोभा वाढवतात. तुमच्या घराला एक वेगळाच लूक मिळतो. मात्र लहान किंवा बेडरूममधल्या खिडकीला पडदा लावताना मात्र ते खिडकीच्या आकारापेक्षा सहा इंचच मोठे असावेत. किचनला मात्र पडदे लावू नका. कारण एक तर किचनच्या खिडकीला पडदे लावल्यामुळे किचनला शोभा येत नाही. उलट आहे ती शोभाही जाते. याशिवाय ते पडदे मळतात हा भाग वेगळाच.
» पडदे नको असतील तर सध्या ट्रान्सपरंट फिल्मचादेखील पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. या फिल्ममुळे तुमच्या घरात उजेडही येईल, शिवाय बाहेरून काही दिसणार नाही. याशिवाय ब्लिंडचादेखील तुम्ही वापर करू शकता म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते बंद किंवा उघडून ठेवू शकता.
» आवडत असल्यास खिडक्यांना रोमन स्टाईलचा लूक द्यावा. रोमन स्टाईल म्हणजे अर्धवट पडदे असतात आणि खाली काच असते. त्याला तुम्ही फुलांचं चित्र असलेले पडदेही लावू शकतात. ग्रील लावले तरीही त्यात मोठया वस्तूंशिवाय अन्य काही ठेवू शकत नाही. मात्र खिडकीत काहीही ठेवता यावं आणि ते खाली पडू नये म्हणून कित्येक जण त्या ग्रीलमध्ये लहानसा लाकडी किंवा अॅक्रेलिकचा बॉक्स करून घेतात. म्हणजे जागा कमी असल्यास त्या जागेचा उपयोग करता येऊ शकतो. कारण त्यात लहान-मोठं सामान आरामात काहीही राहू शकतं. मात्र यामुळे तुमच्या खिडकीचं सौंदर्य बाधित होणार नाही याची काळजी घ्या.
» या खिडक्यांच्या वरच्या बाजूला हूक लटकवून त्यावर तुम्ही झाडंही हँग करू शकतात. मनिप्लांटसारखं झाड तर हँगिंगही खूप छान दिसतं. त्यामुळे त्या खिडकीचा लूक चेंज होतो. ही झाडं तुम्ही अगदी कठडयावरही ठेवू शकता. मात्र त्यासाठी वेगळी झाडं लावावीत. हँगिंग झाडांमध्ये कित्येक प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. रंगीत फुलांची शोभेची झाडं लावलीत तर अधिकच उत्तम, त्यामुळे तुमच्या घराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल.
» झाडं लावायची नसतील तर तुम्ही विंड चाईम लावू शकतात. त्याच्या मंजूळ आवाजाने घरात प्रसन्न वातावरण वाटतं. मात्र ती खूप लांब लावू नये. नाही तर खिडकीवर ती आपटत राहते. बाजारात छान आकाराच्या आणि मंजूळ आवाजाच्या विंड चाईम आहेत. त्यांची निवड करताना घराचा आकार आणि रंगसंगतीचा आवर्जून विचार करावा.
» भरपूर उजेड देणारी खिडकी असेल तर खिडकीत एक छानसा फ्लॉवरपॉट ठेवावा. म्हणजे खिडकी छान दिसेल. त्यातल्या फुलांची रंगसंगती घराच्या रंगाला साजेशी असावी.
» काहींच्या घरात एकाच ठिकाणी मोठया खिडक्या असतात. त्या मोठया खिडक्यांच्या खाली आपण एक बैठक करू शकतो. म्हणजे त्याचा वापर बसायला आणि कोणी पाहुणे मंडळी आल्यास झोपायलादेखील होऊ शकतो. शक्य असल्यास त्या ठिकाणी एक लॅम्पही बसवू शकता.