भाजपाचे खासदार डॉ. चिंतामणी मालवीय यांना खोटे बोलल्याप्रकरणी न्यायालयाने तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
इंदूर- उज्जैन येथील भाजपाचे खासदार डॉ. चिंतामणी मालवीय यांना खोटे बोलल्याप्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम दहा दिवसांत भरण्याचे आदेशही दिले आहेत.
न्यायालयाने नोटीस बजावूनही ते हजर झाले नाहीत. उलट त्यांनी आपण खासदार असून दिल्लीत लोकसभेच्या अधिवेशनात व्यस्त होतो, अशी खोटी आणि बनवाबनवीची उत्तरे शपथपत्राद्वारे देणा-या मालवीय यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले.
मतदारसंघातील माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांनी मालवीय यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना ३१ जुलै रोजी नोटीस बजावली होती. त्यानंतर तब्बल १२ वेळा सुनावणी झाली. मात्र दरवेळी न्यायालयाने बोलावूनदेखील मालवीय हजर झाले नाहीत.
उलट मालवीय यांनी न्यायालयात खोटे शपथपत्र दाखल केले. यात त्यांनी आपल्याला नोटीस मिळालीच नाही. नोटीस नोकराने घेतली पण तो सांगण्यास विसरला. लोकसभेच्या अधिवेशनात मी व्यस्त होतो, अशी अनेक कारणे दिली आहेत.
यावर गुड्डू यांच्या वकिलाने आक्षेप घेतला. खासदार मालवीय दिल्लीला होते, तर त्यांनी येण्या-जाण्याची तिकिटे सादर करावी. संसदेतील हजेरीचे रेकॉर्डही सादर करावे. नोटीस नोकराला मिळाली होती तर त्याने शपथपत्र का दिले नाही? असा प्रश्नांचा भडीमार करुन मालवीय यांना घाम फोडला.
सदर प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास येताच मालवीय यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आणि खोटे शपथपत्र सादर केल्याप्रकरणी तीन हजार रुपये दंड ठोठावला. तसेच त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची खासदारांची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणाच्या तपासासाठी हे प्रकरण न्यायालयाने रजिस्ट्रारकडे सोपवले आहे.