रशियात जहाज बुडाल्याने ५४ मच्छिमारांचा मृत्यू झाला असून १५ जण बेपत्ता आहेत.
मॉस्को- पॅसिपिक समुद्रात रशियाच्या पूर्वेला असलेल्या कामचात्का येथे बुधवारी मध्यरात्री रशियन मच्छिमारी जहाज बुडाल्याने यात ५४ मच्छिमारांचा मृत्यू झाला असून १५ जण बेपत्ता आहेत. रशिया सरकारकडून बचावकार्याला सुरुवात केली आहे.
या मच्छिमारी ट्रॉलरमध्ये १३२ जण होते. यातील ५४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. ६३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अद्यापही १५ जण बेपत्ता आहेत. त्याचा शोध सुरू आहे. येथील शून्य डिग्री तापमानात शोधकार्य करताना अनेक अडचणी येत आहेत. गोठलेल्या बर्फाला धडक बसल्याने हा अपघात झाला आणि अवघ्या १५ मिनिटात जहाज बुडाल्याचे अपघातातून वाचलेल्या एकाने सांगितले.
कामचात्का येथील या मच्छिमारी ट्रॉलरचा मागाडन शहरापासून २५० किमी (१५५ मैल) अंतरावर अपघात झाला.
या जहाजात रशियातील ७८ आणि विदेशातील ५४ नागरिकांचा समावेश आहे. यात म्यानमार, युक्रेन, लिथ्युनिया आणि व्हॅन्यूतू येथील नागरिकांचा समावेश आहे.