चिपळूण तालुक्यात गौण खनिज उत्खननास बंदी असूनही उत्खनन व वाहतूक होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
चिपळूण- तालुक्यात गौण खनिज उत्खननास बंदी असूनही उत्खनन व वाहतूक होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नोव्हेंबर महिन्यात १७ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मिरवणे, बोरगांव, पाथर्डी, सावर्डे पंचक्रोशीत जांभाखाणी आहेत. खांदाटपाली, पाचाड, डेरवण आदी ठिकाणी क्रशर खाणी आहेत. जांभा व क्रशर खाणी सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी हजारे यांच्यासह महसूल प्रशासनाला मिळाली. यानंतर प्रांताधिकारी हजारे यांनी बेकायदा गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पथके तयार केली. तसेच जांभा व क्रशर खाणींवर छापे मारले. यावेळी बेकायदा उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बेकायदा उत्खननाचे मोजमाप करण्याचे आदेश दिले.
याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महसूल प्रशासनाने दंडाची कारवाई केली आहे. तसेच बेकायदा वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधातही कारवाई केली. यामध्ये या व्यावसायिकांकडून १७ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे बेकायदा गौण खनिज उत्खननास चाप बसण्यास मदत झाली आहे. मात्र, ही बंदी झुगारून जांभा उत्खनन व वाहतूक तसेच मिरजोळी, शिरळ, कालुस्ते या ठिकाणी वाळू उत्खनन होत असल्याची चर्चा आहे. ही वाहतूक रात्री ८.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असते. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.