हल्ली जागेची चणचण तर सगळीकडेच असते. परंतु मोठी जागा असेल तरच घर छान सजवता येतं असं काही नाही. काही क्लृप्त्या वापरून इंटिरिअरमध्ये फेरफार केल्यास लहान घरही टापटीप करून मनाजोगतं सजवता येतं. फर्निचरची मांडणी, एकाच फर्निचरचे विविध उपयोग करून लहान जागाही मोठी दिसेल अशी गृहसजावट केल्यास जागा लहान असली तरी नेटकी करता येते. घराच्या रचनेतून तुमचं व्यक्तिमत्त्वही प्रतीत होत असतं. तुमच्या आवडीनिवडी या गृहसजावटीतून नकळतपणे डोकावतात. मग लहान असलं तरी घराला वेगळेपण बहाल करण्यासाठी कोणत्या युक्त्या वापरता येतील हे पाहा..
घराला घरपण येतं ते त्यात राहणा-या माणसांमुळेच. त्यांच्या आवडीनिवडी घरातल्या प्रत्येक वस्तूत प्रतीत होत असतात. घरात राहणा-या माणसांची आवड कशी आहे, त्यांची विचारसरणी आधुनिक आहे की पारंपरिक अशा कितीतरी गोष्टींची उकल ही काटेकोर निरीक्षण शक्ती असलेल्यांना घरातल्या केवळ हॉलच्या सजावटीतूनही दिसून येते. पण हल्लीच्या घरांची जागा इतकी कमी होत चालली आहे की, त्यात काय सजावट करायची हा प्रश्न अनेकांना पडतो. छोटय़ाशा जागेत मनाजोगी सजावट करायला मिळत नाही, ही अनेकांची तक्रार असते. खासकरून गृहिणींची जास्त कारण घर सजावटीचा मुख्य वाटा त्या उचलत असतात. पण घराची जागा किती लहान किंवा मोठी आहे, यावर त्याची सजावट अवलंबून नसतेच. तर सजावट ही जागेचा अंदाज घेऊन किती कलात्मक पद्धतीनं केली गेली आहे, यावर त्याची शोभा अवलंबून असते.
घराची जागा कमी असली तरी त्याची रचना खुबीनं करून तुम्हाला जागा मोठी असल्याचा भास निर्माण करता येतो. त्यासाठी काही गोष्टी आवर्जून पाळाव्या लागतील. लहान जागेत फर्निचर ठेवताना खूप विचार करायला हवा. अशा वेळी कमी जागा व्यापणारं फर्निचर निवडावं. त्यात अवाढव्य सोफे वा टी-पॉय, कॉफी टेबल हे प्रकार शक्यतो टाळावेत. त्याऐवजी एकीकडून दुसरीकडे सहज हलवता येतील अशा खुच्र्या वा घडी घालून ठेवता येण्याजोग्या बैठकी तयार कराव्यात. यामध्ये जपानी पद्धतीचं फर्निचर घेतल्यास जागा तर वाचतेच, पण एकाच फर्निचरचे अनेक उपयोगही करता येतील. अशा फर्निचरचे सोफा कम बेड, स्टडी टेबल कम सिटिंग अरेंजमेंट असे भरपूर पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठी बंक बेड लावून त्यातही जागेची बचत करता येईल. बैठकीच्या खोलीत ठेवण्यासाठी आता कॉम्पक्ट स्टुल्स्, बेड आणि चेअर बेडही मिळतात.
लहान जागेला मोठय़ा जागेचा फील द्यायचा असेल तर खाली वापरल्या जाणा-या कार्पेटच्या डिझाइनवरही लक्ष असू द्या. हे डिझाइन बारीक नक्षीकाम केलेलं असावं. पडद्यांवरील नक्षीबद्दलही हाच नियम लागू होतो. सिल्क स्ट्राइप, व्हर्टिकल स्ट्राइप असलेले पडदे हे जागा मोठी असल्याचा भास निर्माण करतात.
दोन खिडक्यांमध्ये मोकळी जागा असेल किंवा खिडकी आणि दार यांच्या मधल्या जागेवर सजावट करायची असेल, तर मधल्या जागेत फोटो किंवा पेंटिंग लावताना लांबी कमी असलेल्या फ्रेमचा वापर करावा.
सोफा जुना असेल तरी त्याचं कव्हर नवीन घालता येईल. रंगीबेरंगी डिझाइन्सच्या उशांच्या कव्र्हसनी त्याला आणखी आकर्षक बनवता येईल. घराला सजवताना हलक्या-फुलक्या वस्तूंचा वापर करा. जसं की फुलदाण्या, ग्लास पिसेस, हँगिंग पिसेस, टेबल लॅम्प यांचा वापर करता येतो. रंगीत काचेच्या शोभेच्या वस्तू, विविध आकारांचे आकर्षक दगड यांचाही वापर करता येईल. जुन्या-नव्याचा संगम करायचा असेल तर ग्रामोफोन वा अॅन्टिक लूक असलेल्या टेलिफोनचाही शोपीससारखा उपयोग करून घेता येईल.
घर सजावटीचे कानमंत्र
घराची सजावट करताना काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात. जसं की कधीही घाईघाईत सजावटीचा निर्णय घेऊ नये. घराला नक्की कोणत्या थीममध्ये सजवायचं आहे याचा आधी विचार करा, त्याप्रमाणे सजावटीचं सामान गोळा करा आणि नंतरच त्याची सुरुवात करा. बजेट तयार करूनच सजावटीला सुरुवात करावी. छोटय़ा गोष्टीही मोठी कामगिरी बजावू शकतात. जसं की एखादा रंग, कार्पेट वा कॉफी टेबल तुमच्या सजावटीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. शार्प कॉर्नर नको असतील तर राउंड टेबल निवडा. घराची सजावट करताना ९० अंशांचा नियम पाळला तर बरीच जागा वाचू शकते. जसं की टेबल, कार्पेट, टी.व्ही., खुच्र्या यांच्यात ९० अंशांचा कोन ठेवा. रेडिमेड फर्निचर आणून तुम्ही सजावट करू शकता पण त्याला ‘पर्सनल टच’ द्यायचा असेल, तर कॉम्बीनेशन करायला विसरू नका. फर्निचरची रंगसंगती ही खोलीच्या रंगांशी मिळतीजुळती करा. सगळंच मॅचिंग करण्याऐवजी काही वस्तू वेगळ्या दिसतील याचीही काळजी घ्या. वेगवेगळ्या थीम वापरण्यावर भर द्या. यातून तुमच्या सजावटीतलं वैविध्य दिसून येईल. मात्र एक खोली एकदम मॉडर्न आणि दुसरी अगदीच पारंपरिक असं करणं टाळा. त्यातला तोल सांभाळला जाईल याकडे लक्ष द्या.
नैसर्गिक रचना करायची असल्यास तुम्हाला फुलांचा वापर करावा लागेल. यात फुलं फुलदाणीत सजवावीत. खोल्या लहान असतील तर एका खोलीत एकापेक्षा जास्त फुलदाण्या ठेवू नयेत. ठेवायच्याच असतील तर विषमरचनेत आणि संख्येत ठेवाव्यात. फुलदाण्यांऐवजी कॅण्डलचाही वापर करता येईल. हॉल मोठा दिसण्यासाठी त्याच्या दोन कोप-यात लोंबत्या दिव्यांची रचनाही उठून दिसते. अशा वेळी टय़ूब लाइटचा वापर करणं टाळावं. घराच्या एखाद्या भिंतीवर हस्तकला अथवा तुम्ही स्वत:ही काही चित्रं काढू शकता. त्यासाठी फुलं-पानांची मोठी नक्षी ट्रेस करा आणि त्यात आवडतील ते रंग भरा. एक वेगळा सजावटीचा अनुभव त्यातून मिळू शकतो. काही वेळा एखादा जुना फोटोही नवा लुक देऊन भिंतीवर सजवता येईल.
लहान घरातील सजावट करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या घराची भरभरून सजावट करू नका. थोडी मोकळी जागाही ठेवा. नाही तर सगळीकडेच सजावटीचा भडीमार होईल. घराची सजावट सहज बदलता येईल, अशी असावी म्हणजे छोटय़ा घरातही बदल करून त्याला नवनवीन प्रकारे सजवण्याचा प्रयत्न करता येतो. घर कितीही लहान किंवा मोठं असलं तरी त्याची सजावट नित्यनवीन पद्धतीनं करता आली, तर त्यातून मिळणारा मनाला येणारा तजेला काही औरच असतो. – (आदित्य फीचर्स)