घराचं संपूर्ण रूप हे घराच्या ठेवणीवर अवलंबून असतं. घर बांधताना साधारणत: आपण कीचन, बेडरूम, हॉल, आदीबरोबरच स्टोअर रूम याशिवाय घराला गच्ची, अंगण आणि घराचा उंबरठा यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. पण, घराच्या या स्वरूपाबरोबरच घराच्या सौंदर्यात अधिक भर घालणारा जिना हा वास्तूच्या बांधणीतील महत्त्वाचा हिस्सा मानावा लागेल.
आजही पाहिलं तर, घर बांधताना सर्वसाधारण जिन्याचा विचार केला जातो. घराच्या उजव्या-डाव्या कोप-यात जिना साकारला जातो. साधारण जुनी घरं पाहिली तर, त्या घरामध्ये एक तरी जिना असतोच असतो. घराच्या आतील बाजूस, पोटमाळा काढला असेल तर, दुमजली घरं असतील तर, किंवा मूळ घरात मालकाचं वास्तव्य आणि वरील भागातील रूमसाठी जिन्याचा वापर केला जातो.
पूर्वी साकारण्यात आलेल्या घरांमध्ये आजही काही ठिकाणी लाकडाचे जिने पाहायला मिळतात. या जिन्यांच्या पाय-या, जिन्याचा खांब सागवानी लाकडाचा किंवा आंब्याच्या लाकडाचाही वापर केलेला दिसून येतो. मात्र लाकूड हे लवकर खराब होत असल्याने यामध्ये सुधारणा म्हणून प्लायवूडचा वापर किंवा स्टीलचे जिनेही बनवून घराला नव्या स्वरूपात आकार देऊन सौंदर्यात भर घातली जाते.
जिन्यांमध्ये साधे सरळ जिने, गोलाकृती जिने, अर्धवर्तुळाकार जिने, उंचच उंच जिने, बिल्डिंगमधील जिने, चाळीतील घराचे जिने हे वेगवेगळय़ा स्वरूपाचे असतात. लाकडी जिन्यांचं स्वरूप हे जुनं वाटत असलं तरी, काही घरांमध्ये कलाकुसरीने साकारलेले जिने हे लक्ष वेधून घेणारे ठरतात. तर वेगवेगळय़ा डिझाईनही घराच्या सौंदर्यात भर घालतात. स्टीलच्या जिन्यांबरोबरच, सिमेंटचे जिने मजबूत आणि टिकाऊपणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या जिन्यांवर वेगवेगळय़ा डिझाईनचे, रंगाचे टाईल्स लावून जिन्याच्या सौंदर्यात भर घातली जाते.
जिने साकारताना त्यांना एका बाजूने आधारासाठी बारीक स्टीलचे खांब, एका रेषेत साकारले जातात किंवा आपल्या आवडीनुसार जिन्यांना लाकडाचे बारीक खांब, रुळाप्रमाणे, चौकनी आकाराचे लावून साकारले जातात. यामध्ये लाकडाच्या चपटय़ा पट्टय़ांचाही वापर केला जाऊ शकतो.
जिना कोणताही असो, घराचा अथवा बिल्डिंगचा किंवा घराच्या गच्चीचा, तो चढता-उतरताना शक्यतो वयस्कर व्यक्तींची मात्र दमछाक होऊन जाते. पण, निवांतपणासाठी, सायंकाळच्या गप्पांसाठी, चहा पिण्यासाठी, मित्रांसोबतच्या गप्पा, मैफलींसाठी घराची गच्ची ही विशिष्ट मानली जाते. पण गच्चीत जाण्यासाठी जिन्याचा वापर हा करावाच लागतो अशावेळी जिन्याला असणा-या आधारभूत रेलिंगचा वापर करावा लागतो. घरातील जिने चढण्यासाठी आधारासाठी लाकडी गोलाईकृत, चौकोनी मोठी खांबपट्टी किंवा स्टील, लोखंडी पाईपचा वापरही केला जातो.
जिन्याला दादर असेही म्हणतात. पाय-या-पाय-यांचे जिने चढता-उतरताना वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांची काळजीही घेणे आवश्यक असते. एखाद्या घराचा जिना पाहिला, तर तो चढण्याचा मोह होतोच. जिन्यांच्या डिझाईन मनात भरतात. किती मजली घर असेल, त्याप्रमाणे घराचे जिने साकारले जातात. काही जिने उंचावरून पाहिले तर खोल-खोल नजर न पोहोचणारे भासतात. नाटक, सिनेमांमध्ये जिन्यांशिवाय वास्तू पाहायला मिळत नाही. हिंदी चित्रपटांचे सेट, वास्तूचे जिने हे भले मोठे, उंच आणि नक्षी, कलाकृतींनी साकारलेले दिसतात. या वास्तू, बंगल्यांची परिपूर्णता ही जिन्यातच सामावलेली असते. जिन्यामुळे घर, बंगल्याला येणारा वेगळा लूक हा आकर्षक वाटतो.
घराच्या पारंपरिकतेबरोबरच नव्या स्वरूपात अलीकडे साकारली जाणारी घरे ही स्लॅब स्वरूपाची असली, बैठी असली तरी त्या घराला आतून अथवा घराच्या बाहेरून एक तरी जिना दिसून येतोच येतो. घराच्या आतील जिने जसे मनोवेधक तसेच घराच्या बाहेरून साकारलेले जिने हेदेखील त्या वास्तूच्या सौंदर्यात भरच घालणारे.. जिना कोणत्याही स्वरूपाचा असो, लाकडी, धातूचा अथवा सिमेंट-विटांचा त्या जिन्यांचे विविध आकार, डिझाईन हे त्या त्या वास्तूचं सौंदर्य खुलवतातच.. यामुळे कधी-कधी जुन्याचा नवा आविष्कारही पाहायला मिळतो.