महिला व बालविकास मंत्रालयाच्या चिक्की आणि इतर वस्तूंच्या खरेदीतील भ्रष्टाचाराचे पुरावे मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवणार आहेत.
मुंबई- महिला व बालविकास मंत्रालयाच्या चिक्की आणि इतर वस्तूंच्या खरेदीतील भ्रष्टाचाराचे पुरावे मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवणार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाने एकाच दिवसात केलेली २०६ कोटींची खरेदी वादाच्या भोव-यात सापडली आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने यापूर्वीच केली आहे.
या खरेदीत अनेक ठिकाणी गरव्यवहार झाल्याचे उपलब्ध दस्तऐवजांवरून स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची तातडीने चौकशी सुरू करायला हवी होती. पंकजा मुंडे मंत्रीपदावर असताना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी शक्य नसल्याने सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घेणेही अपेक्षित होते.
पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले तरी त्यावर योग्य चौकशी होण्याची शक्यता नसल्याने हे पुरावे थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजता सचिन सावंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख प्रवीणकुमार दीक्षित यांची भेट घेऊन चिक्की घोटाळय़ाचे सर्व पुरावे सादर करणार आहेत.