माजी खासदार निलेश राणे यांच्या निधीतून शहरात झालेल्या गणेश विसर्जन घाटाच्या कामाचा २० लाखांचा धनादेश बुधवारी नगर परिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
चिपळूण – माजी खासदार निलेश राणे यांच्या निधीतून शहरात झालेल्या गणेश विसर्जन घाटाच्या कामाचा २० लाखांचा धनादेश बुधवारी नगर परिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
कॉँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, नगरसेवक कबीर काद्री यांनी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. त्यामुळे खासदारांचा निधी येणारच नाही, अशा वावडय़ा उठविणा-यांना चांगली चपराक मिळाली आहे. शिवाय चिपळूण न.प.ला खासदार फंडातून निधी देणारे माजी खासदार निलेश राणे हे पहिलेच खासदार ठरले आहेत. त्यामुळे माजी खासदार श्री. राणे यांनी दिलेला शब्द पाळल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील बाजारपुलाजवळ गेल्या वर्षी माजी खासदार निलेश राणे यांच्या खासदार निधीतून गणेश विसर्जन घाटाचे काम करण्यात आले. या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय व्हायची. ही गरज ओळखून शहराध्यक्ष भोसले, शाह, काद्री यांनी माजी खासदार राणे यांच्याकडे गणेश विसर्जन घाटासंदर्भात बोलणी केली.
त्यानुसार श्री. राणे यांनी तात्काळ २० लाखांच्या निधीला मंजुरी दिली. त्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, या कामाचे बील मंजूर होण्यास विलंब झाला त्यामुळे सत्ताधा-यांनी ठेकेदाराला न. प. फंडातून १० लाख रुपये देण्याचा ठराव केला. मात्र, या ठरावाला शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यांचा विरोध मोडीत काढत सत्ताधा-यांनी ठेकेदाराला १० लाख रुपये देण्याचा ठराव केला.
मात्र, ठेकेदाराला हे १० लाख देण्याआधीच खासदार निधीतून २० लाखांचा धनादेश न.प.ला प्राप्त झाला आहे. यामुळे या निधीबाबत शंका असणा-यांना जोरदार उत्तर मिळाले आहे.
श्री. राणे यांनी या कामाला निधी मिळवून दिला आणि स्थानिक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सततचा पाठपुरावा केल्याने हे काम मार्गी लागले. याबाबत भोसले, शाह, काद्री यांनी माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले. कॉँग्रेसचे कार्यकर्ते दिलेला शब्द पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात, हे यानिमित्ताने समोर आले आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्ह्यासाठी एकूण ११ कोटी ७० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी शिफारस केली होती. मात्र, सन २०१३-१४ मध्ये खर्च करावयाच्या ५ कोटी निधीपैकी पहिला टप्पा न आल्याने कामांची बिले खर्च झाली नव्हती. या दरम्यान काहींनी श्री. राणे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या कामांना निधी येणार नाही, अशी वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल केली होती. याची दखल घेत श्री. राणे यांनी गेल्या आठवडय़ात दिल्लीत नियोजन विभागाशी संपर्क साधत उर्वरित २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा केला. त्यामुळे खासदारांच्या निधीतून निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे त्यांनी शिफारस केलेली सर्व कामे मार्गी लागली आहेत.