चीनच्या सिचुआन प्रांतात शनिवारी झालेल्या भूकंपात १५६ जणांचा मृत्यू झाला, तर ५००० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले.
बिजिंग- चीनच्या सिचुआन प्रांतात शनिवारी सकाळी झालेल्या भूकंपात १५६ जणांचा मृत्यू झाला, तर ५००० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल अशी नोंदवली गेली.
हा भाग डोंगराळ असल्याने मृतांची संख्या वाढली असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. अनेक इमारतींची, घरांची पडझड झाली असून, प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सिचुआन प्रांतात २००८मध्येही मोठा भूकंप झाला होता, त्यात तब्बल ९० हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक इमारतींची पडझड झाली आहे. सिचुआनमध्ये युध्दपातळीवर बचाव मोहिम सुरु करण्यात आली आहे.
चीनमध्ये अनेक शहरात या भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाची कंपने जाणवताच अनेकांनी आहे त्या स्थितीत घराबाहेर पळ काढत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. सिचुआनमध्ये पाचवर्षांनी पून्हा एकदा विध्वंसक भूकंप झाला आहे असे प्रशासनातील अधिका-यांनी सांगितले.
याअँन आणि लुशान भागाला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे मोठया प्रमाणावर जिवीत व वित्तहानी झाल्याची शक्यता आहे. सिचुआनप्रांत डोंगराळ भाग असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद झाले आहेत. घटनास्थळी दोनहजार बचावपथके पाठविण्यात आल्याची माहिती शिनुह्आ वृत्तसंस्थेने दिली आहे.