रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यांचे अतूट बंधन. सर्वत्र मोठय़ा उत्साहामध्ये होणा-या या उत्सवाची झलक छोटय़ा पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. रक्षाबंधनानिमित्त ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे, ‘घाडगे अँड सून’ मालिकेतील अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील राधा देशमुख-वीणा जगताप, प्रेम देशमुख-सचित पाटील यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले आहेत.
वेळ काढून, सण साजरे करून, जतन करूया!
रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही काही प्रमाणात जोपासली जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. प्रत्येकजण स्वत:च्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे सगळय़ांनाच हा दिवस साजरा करायला मिळतोच असे नाही. काळानुसार गोष्टी बदलतात, हे खरे आहे. पूर्वी भाऊ-बहीण भेटून हा दिवस साजरा करायचे. पण, आता ‘अॅडव्हान्स’ जगात मेल, कुरिअरने राख्या पाठवून शुभेच्छा दिल्या जातात. कामाच्या व्यापातून आपण प्रत्येकाने स्वत:च्या माणसांसाठी थोडासा वेळ काढून आपले सण साजरे करून त्यांचे जतन करूया.
– समृद्धी केळकर (लक्ष्मी)
बहिणीला दिलेले सरप्राईझ!
‘ब-याचदा मला रक्षाबंधनला सुट्टी मिळायची नाही. चार वर्षापूर्वी रक्षाबंधनाला सुट्टी मिळण्याची शक्यता नसल्याने ‘नेहमीप्रमाणे तुला पार्सलने राखी पाठवावी लागेल,’ असे मी बहिणीला सांगितले. पण, अनपेक्षितपणे मला सुट्टी मिळाली आणि मी बहिणीला ‘सरप्राईज’ दिले. त्यावेळचे ‘रक्षाबंधन’ हे आम्हा दोघांसाठी विशेष होते. यंदा शूटिंगमुळे मी गावी जाऊ शकणार नाही. त्यामुळे ‘व्हीडिओ कॉल’वरून रक्षाबंधन साजरे करावे लागेल.
– ओमप्रकाश शिंदे (मल्हार)
यंदा रक्षाबंधन माझ्या घरी!
यावर्षीचं रक्षाबंधन माझ्या घरी होणार आहे. आम्ही छान जेवणाचा आणि गप्पांचा बेत आखला आहे. बहीण-भाऊ हे नाते खूप विशेष आणि जवळचे असते. त्यामुळेच दरवर्षी मी आणि माझी बहीण सोनल नित्यनेमाने रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी करतो. सणांच्या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र भेटण्याची संधी मिळते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक रक्षाबंधन हे खास आहे.
– सचित पाटील (प्रेम देशमुख)
लहानपणीचे रक्षाबंधन अद्याप आठवते
माझ्या आठवणीमध्ये राहिलेले रक्षाबंधन म्हणजे मी लहानपणी भावाला राखी बांधायच्या आधीच गिफ्ट मागितले होते. ‘गिफ्ट दे, मग राखी बांधेन’ असे म्हटल्यावर त्यावेळी सगळे हसले होते. आधी ‘गिफ्ट’ घेऊन मग राखी बांधली. अजूनही मी आणि माझे भाऊ हा सण साजरा करतो. शूटिंगमुळे मला यंदा वेळ देता येईल की नाही, हे ठाऊक नाही. पण, वेळ मिळाला तर नक्की आम्ही नेहमीसारखा दंगा घालणार एवढे नक्की.
– वीणा जगताप (राधा देशमुख)
रिमांड होममधील रक्षाबंधन अजूनही आठवते!
दरवर्षी मी माझ्या भावाला राखी बांधतेच आणि मी त्याची एकुलती एक लाडकी बहीण असल्यामुळे त्याच्याकडून मला ‘सरप्राईझ गिफ्ट’ मिळते. कधी कॅडबरी, कधी रिस्टवॉच तर कधी मोबाईल. लहानपणी कॉलनीतल्या सर्व मुली आपापल्या भावांना तर राखी बांधायचो. पण, कॉलनीतील सर्व मुलांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी जायचो. तेव्हा आम्हाला टिकल्या, बांगडय़ा, खडूपेटी, पेन्सिल असे गिफ्ट मिळत असे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी माझ्या आईबरोबर एकदा ‘रिमांडहोम’मधील मुलांना राखी बांधण्यासाठी गेले होते. त्या मुलांना आम्ही राखी बांधली, खाऊ दिला आणि सोबत गिफ्टही. त्यावेळेचा त्या मुलांच्या चेह-यावरचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. आता वेळेच्या अभावी राखी ‘ऑनलाईन’ पाठवावी लागते. पण, फोनवर खूप बोलणे होते.
– भाग्यश्री लिमये (अमृता)