एरवी शांत असणारे जर्मनीचे रस्ते सोमवारी पहाटे उत्साहाने गजबजले होते. जर्मनीच्या प्रत्येक शहरात, गल्लीबोळात आनंद, उत्साह, जल्लोषाला उधाण आले होते.
बर्लिन – एरवी शांत असणारे जर्मनीचे रस्ते सोमवारी पहाटे उत्साहाने गजबजले होते. जर्मनीच्या प्रत्येक शहरात, गल्लीबोळात आनंद, उत्साह, जल्लोषाला उधाण आले होते. कारणही तसेच होते. अर्जेंटिनाला नमवून जर्मनीने चौथ्यांदा फुटबॉलच्या जगज्जेतेपदाला गवसणी घातली होती.
प्रत्येक जर्मन नागरिक या विश्वविजेतेपदाचा आनंद साजरा करत होता. एरवी शांत असणा-या जर्मनीचे रस्त्यांवर संगीत, नृत्य गाडयांच्या हॉर्नचा कलकलाट सुरु होता. कोणी हॉर्न वाजवून, कोणी डिजेच्या तालावर ठेका धरुन आपला आनंद साजरा करत होते. आपल्या संघाने केलेल्या विश्वविजयी कामगिरीमुळे प्रत्येक जर्मन नागरिकांचा उर आज अभिमानाने भरुन आला होता. काही जर्मन नागरिक राष्ट्रध्वज हाती घेऊन, देशभक्तीच्या घोषणा देत होते.
आपण पुन्हा एकदा फुटबॉलमधील महासत्ता झाल्याचा आनंद जर्मन नागरिकांच्या चेह-यावरुन ओसांडून वाहत होता. एकीकरणानंतर जर्मनीने जिंकलेले हे पहिलेच विश्वविजेतेपद आहे. यापूर्वी १९९० मध्ये जर्मनीने फुटबॉलचे जगज्जेतेपद पटकावले होते. जर्मनीच्या हॉटेल, पब, बारमध्ये हा आनंद साजरा होत होता.
या क्षणाला मी या जगातला सर्वात आनंदी माणूस आहे. बर्लिनची भिंत पडली तेव्हा मी लहान होतो. यापूर्वी या शहराने असा जल्लोष, आनंद कधी पाहिलेला नाही अशी प्रतिक्रिया जेकॉब वॉगली या जर्मन नागरिकाने दिली.
अंतिम सामना हा ह्दयविकाराच्या झटक्यासारखा होता. मारिओ गोट्झेने गोल झळकवल्यानंतर पुढच्या सहा-सात मिनिटांसाठी संपूर्ण देशाचे श्वास रोखला गेला होता असे सॅम शॉनबर्ग यांनी सांगितले. १९९० मध्ये जेव्हा जर्मनीने अर्जेंटिनाला नमवून शेवटचे विश्वविजेतेपद जिंकले तेव्हा आजच्या सामन्याचा हिरो मारिओ गोट्झेचा जन्मही झाला नव्हता अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.