अमेरिकेतील अटलांटिका सिटीमध्ये झालेल्या जागतिक वाळूशिल्प स्पर्धेत भारताचे सुदर्शन पटनायक यांना पिपल्स चॉइस पुरस्कार मिळाला आहे.
बोस्टन- अमेरिकेतील अटलांटिका सिटीमध्ये झालेल्या जागतिक वाळूशिल्प स्पर्धेत भारताचे सुदर्शन पटनायक यांना पिपल्स चॉइस पुरस्कार मिळाला आहे. अटलांटिका शहराच्या महापौरांच्या हस्ते पटनायक यांना हा पुरस्कार देण्यात आला.
१९ जून रोजी झालेल्या या स्पर्धेत कलाकारांना १० टन वाळूद्वारे ३० तासांमध्ये कलाकृती सादर करायची होती. या स्पर्धेत जगभरातील २० वाळूशिल्प कलाकारांनी सहभाग घेतला होता. सुदर्शन यांच्या ‘झाडे वाचवा, भविष्य वाचवा’ या कलाकृतीला हा पुरस्कार मिळाला आहे.
याशिवाय सुदर्शन आणि अमेरिकेचे शिल्पकार मॅथ्यू रॉय डॉबर्ट यांनी मिश्र शिल्पकला प्रकारचा ताजमहलची निर्मिती केली होती. त्यात त्यांना पाचवे स्थान मिळाले.
देशासाठी पुरस्कार मिळवल्याबद्दल खुप आनंद झाल्याची प्रतिक्रिया सुदर्शन यांनी यावेळी व्यक्त केली. यासाठी ज्यांनी पाठिंबा दिला आणि मतदान केले त्यांचे सुदर्शन यांनी आभार मानले.
पटनायक यांना याआधी ५०हून अधिक आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. गेल्याच वर्षी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.