जानवली वनराईमध्ये शासकीय गोदाम बांधण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
कणकवली- जानवली वनराईमध्ये शासकीय गोदाम बांधण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी वनराईतील जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या भूमिअभिलेख खात्याच्या अधिकारी व कर्मचा-यांना तीव्र विरोध करून गोदामाची नियोजित मोजणी जानवली ग्रामस्थांनी बंद पाडली.
देवस्थानच्या शासकीय जागेमध्ये गोदाम होऊ नये, असा पवित्रा जानवली गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत जानवली ग्रामस्थ व शासकीय अधिका-यांमध्ये ८ जानेवारीला जानवली येथील देवालयामध्ये हरकतींबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती जानवली गावातील ग्रामस्थांनी दिली.
कणकवली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जानवली येथील भूमापन क्र.२९ जुना सध्याचा सव्र्हेने ८ हि.नं. ० क्षेत्र १०-४४-० हे.आर. ही सरकारी देवराई आहे. या देवराईमध्ये श्री देव लिंगेश्वर, श्री देव पावणाईसह अन्य ५ मंदिरे आहेत. त्यामध्ये पिढयान्-पिढयांची झाडे आहेत.
तसेच सामाजिक वनीकरणामार्फत वनसंवर्धन करून मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच पाचही मंदिरांमध्ये जाणारे रस्ते आहेत. गावाचा संपूर्ण वावर या मिळकतीतून होत आहे. त्यामुळे शासकीय गोदाम जानवली येथे होऊ नये म्हणून शासन दरबारी विरोध करूनही तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिका-यांनी ग्रामस्थांनी विश्वासात घेतले नाही.
१७ ऑगस्ट तहसीलदार कणकवली व प्रांताधिकारी कणकवली यांच्याकडे गोदाम बांधण्यात हरकत नोंदविली होती. त्यानंतर ५ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकत केली होती. गुरुवार ३१ डिसेंबर रोजी गोदामाच्या नियोजित जागेसंबंधी मोजणीस लगतच्या खातेदारांना व देवस्थान कमिटीला विश्वासात न घेतल्यामुळे मोजणी बंद पाडली.
भूमिअधिक्षक श्री. बोवलेकर यांनी मोजणी थांबवली.यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग अर्जुन राणे, विजयसिंग राणे, बाळाजी राणे, हेमंत राणे, शंकर राणे, संतोष सावंत, गणेश परब, सखाराम तेली, महेश घाडी, काशिराम जंगम, मनोहर मेस्त्री यावेळी उपस्थित होते.