ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई – सहा दशकांची कारकीर्द, तब्बल ३५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम.. ज्येष्ठ अभिनेते प्राण यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान आणि ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या महान अभिनेत्याचा यंदा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मान होणार आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी प्राण यांच्या नावाची घोषणा केली. १९४२मध्ये आलेल्या ‘खानदान’ या चित्रपटातून त्यांनी नायक म्हणून पदार्पण केले. ‘यमला जाट’ या पंजाबी चित्रपटातून १९४५मध्ये त्यांनी पहिल्यांदा खलनायक रंगवला आणि त्यानंतर तीच त्यांची ओळख बनली.
खलनायकी भूमिका करत असताना त्यांनी वापरलेल्या विविध लकबीही प्रेक्षकांना प्रचंड भावल्या. सुरुवातीच्या काळात ‘अदालत’, ‘बडी बहेन’ यांसारख्या चित्रपटातल्या त्यांच्या खलनायकी भूमिका लक्षवेधी ठरल्या. १९६४नंतर आलेल्या ‘पूजा के
फुल’ व ‘काश्मीर की कली’ या चित्रपटातल्या विनोदी भूमिकांनाही प्रेक्षकांनी दाद दिली. अभिनेता मेहमूद यांच्याबरोबरही त्यांची जोडी विशेष जमली. ‘साधू और शैतान’ या चित्रपटातली त्यांची भूमिका तर खलनायकापेक्षा सहनायकाची म्हणून गणली गेली. त्यात त्यांनी वेगवेगळय़ा वेषात येऊन आपल्या अभिनयाची जादू दाखवली. १९६७मध्ये आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटातून त्यांनी चरित्र भूमिका करायला सुरुवात केली.
या चित्रपटातले त्यांच्यावर चित्रित झालेले ‘कस्मे वादे प्यार वफा सब..’ हे गीत विशेष गाजले. ‘व्हिक्टोरिया नं. २०३’ मधले अशोक कुमार यांच्या साथीने सादर केलेले ‘दो बेचारे बिना सहारे..’ हे गीत आजही रसिकांच्या लक्षात आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘डॉन’ मधली त्यांची भूमिका व ‘शराबी’मधली अमिताभच्या वडिलांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. ‘जंजीर’मधले अमिताभ बरोबरच ‘यारी है इमान मेरा..’ या गीताला विसरणे शक्य नाही. १९९८ नंतर त्यांनी जवळजवळ सेवानिवत्ती स्वीकारली असली तरी काही चित्रपटांमध्ये पाहुणे कलाकार म्हणूनही ते चमकले आहेत.
एक वडिलधारी व्यक्ती म्हणून मला प्राण यांच्याविषयी नेहमीच आदर आहे. ते चित्रपटाच्या शुटींगसाठी नेहमी वेळेवर हजर असत. आम्ही दोघांनी खूप चित्रपट एकत्र केले आहेत. खलनायकाची भूमिका साकारताना प्राण यांनी नेहमीच भूमिकेला न्याय दिला आहे. – अमिताभ बच्चन, अभिनेता