हेडिंग वाचून झुंबा नक्की काय प्रकरण आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. सध्या योगा, अॅरोबिक्सच्या यादीत तुम्हाला झुंबा हे नाव देखील पाहायला मिळेल. नाव वाचून तुम्ही मनातल्या मनात हा काहीतरी आफ्रिकन आदिवासी लोकांचा नृत्यप्रकार दिसतोय अशी कल्पना केली असेल. पण झुंबा नक्की काय आहे? सध्या मोठ मोठय़ा शहरात झुंबाचं वेड का पसरत चाललंय याची थोडीशी झलक.
भारतातील पारंपरिक नृत्यप्रकारानंतर हळूहळू वेगवेगळे डान्सचे प्रकार भारतात येऊ लागले. हिप हॉप, सालसा, जॅझ अशा आंतरराष्ट्रीय डान्सच्या प्रकारांनी अनेकांना वेड लावलं. नवीन काहीतरी शिकयोत यामुळे अनेकांनी या डान्स क्लासेसना प्रवेश घेतला. पण या डान्स क्लासेसचा एक विशिष्ट वर्ग होता तो वर्ग म्हणजे ज्यांना डान्स येतो किंवा ज्यांना डान्सची आवड आहे असा वर्ग.
त्या पलीकडे ज्यांना नाचता येत नाही असा मोठा वर्ग मात्र यापासून लांब राहिला. त्यातल्या अवघड स्टेप्स आपल्याला जमणार नाही, त्यासाठी लागणारे भाव आपल्या चेह-यावर नाहीत, वेगवेगळ्या स्टेप्स करण्यासाठी लागणारी लवचिकताही अंगात नाही, मग या सालला, जॅझ, हिप हॉपच्या फंदात कशाला पडायचे असा विचार अनेकांच्या मनात येतो.
त्यातून हे डान्स शिकून आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायचं? आपल्याला थोडीच मोठा डान्सर बनायचं आहे, असे अनेक प्रश्न मनात यायचे. त्यामुळे डान्सचं वेड असलेले लोक वगळता याकडे फारसं कोणी वळलंच नाही.
पण कोणी असं सांगितलं की अमुक एक डान्स प्रकार शिकलात तर तुम्ही एकदम फिट व्हाल. आरोग्याविषयीच्या तुमच्या अनेक समस्या दूर होतील. हे ऐकून कोणीही तो डान्स प्रकार शिकण्यासाठी सहज तयार होईल. बरोबर ना! झुंबा नेमका हाच प्रकार आहे. हा एक डान्स फिटनेस प्रकार आहे.
९०च्या दशकात एका कोलंबीयन नृत्यदिग्दर्शकानं हा डान्स फिटनेस प्रकार तयार केला. विशेष म्हणजे हा झुंबा डान्स शिकण्यासाठी तुम्हाला उत्तम डान्स आलाच पाहिजे अशी कोणतीच अट नाही. सध्या जगभरातील १८० देशांमध्ये या झुंबाचे क्लासेस घेतले जातात.
फिटनेस म्हणजेच उत्तम आरोग्याची कल्पना हळूहळू भारतात पसरत चालली आहे. वाढतं वजन, सुटलेलं पोट अशा अनेक समस्या असतात. या समस्येपासून आपल्याला कसं दूर राहता येईल याचा विचार करून अनेक जण जिमिंग किंवा योगासनांकडे वळतात. पण या दोन पर्यायांपेक्षा तुम्हाला वेगळं काही हवं असेल तर झुंबा पर्यायाचा विचार करायला हरकत नाही.
सोप्या भाषेत सांगायचं तर संगीताच्या तालावर वेगवेगळ्या स्टेप्स करायच्या आणि त्यामार्फत आपलं वजन घटवायचं. थोडक्यात डान्स करता करता वजन घटवायचं. ही कल्पना एकदम भन्नाट आहे की नाही. पण हा डान्स फिटनेस प्रकार फक्त तरुणवर्गानी शिकावा असं नाही.
अगदी लहान मुलांपासून ६० ते ७० वर्षाचा वयोवृद्ध देखील झुंबा शिकू शकतो. त्यामुळे वयाचं बंधन इथे अजिबात नाही. झुंबा क्लासेसमध्ये तुम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी गाण्यांच्या तालावर थिरकता थिरकता कितीतरी कॅलरीज बर्न करू शकता. या झुंबाचे वेगवेगळे प्रकार आहेत. झुंबा टोनिंग,अॅक्वा झुंबा, झुंबा गोल्ड, झुंबा गोल्ड टोनिंग, झुंबा किड्स असे वेगवेगळे प्रकार यात आहेत.
जी लहान मुलं घरात बसून असतात. ज्यांना फारशा अॅक्टिव्हिटीज करायला मिळत नाहीत अशी मुलं मग स्थूल बनत जातात. वजनवाढीच्या समस्येने त्रासतात. त्यांच्यातला अॅक्टिव्हपणा निघून जातो अशा मुलांसाठी देखील किड्स झुंबा आहे, जो त्यांना अॅक्टिव्ह राहण्यासाठी मदत करतो. वृद्ध लोकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सोप्या पण त्यांना फिट ठेवता येईल अशा झुंबा स्टेप्स आहेत.
या झुंबाचे अनेक फायदे आहेत. डान्स करता करता वजन किंवा कमरेखालील वाढलेलं वजन यामुळे नियंत्रित करता येतं. अनेकांचं पोट सुटलेलं असतं, हे पोट कमी करण्यासाठी देखील झुंबा मदत करतं. शरीरात लवचिकता येते.
झुंबाच्या काही खास स्टेप हे शरीराला योग्य आकारात ठेवण्यासाठी मदत करतात. या डान्स फिटनेस प्रकाराला गाण्यांची जोड असल्यानं मन देखील प्रसन्न होतं. मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी झुंबा अत्यंत उपयोगी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डान्स देखील शिकता.
झुंबाची www.zumba.com ही अधिकृत वेबसाईट आहे. जिथे तुम्हाला या डान्स फिटनेस प्रकाराची आणखी माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे झुंबाचे अधिकृत ट्रेनर तुमच्या शहरात कुठे आहेत, कुठे याचे क्लासेस चालतात याची माहिती देखील तुम्हाला मिळेल.