मानधनावरुन वाद झाल्याने भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा देणा-या टेरी वॉल्श यांनी बुधवारी राजीनामा मागे घेतला आहे.
नवी दिल्ली– भारताच्या सिनियर हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. मानधनाच्या मुद्दयावरून भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) महासंचालक जिजी थॉमसन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर वॉल्श यांनी राजीनामा मागे घेतल्याचे क्रीडामंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी बुधवारी ‘ट्विटर’द्वारे सांगितले.
‘साई’चे महासंचालक थॉमसन यांनी मंगळवारी वॉल्श यांची मनधरणी केली. त्यांचा नव्याने करार करण्याची तयारी प्राधिकरणाने दर्शवली आहे. ‘‘क्रीडा प्राधिकरणाच्या माझ्या कार्यालयात मी वॉल्श यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ‘साई’सोबत काहीच वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. मानधनाबाबतचा मुद्दा लवकरच निकालात काढला जाईल, असे आम्ही त्यांना म्हटले. वॉल्श यांनी यापुढेही मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळावी, असे आम्हाला वाटते. त्यांना १९ नोव्हेंबरपासून मुदतवाढ दिली जाईल,’’ असे थॉमसन यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना सांगितले.
क्रीडा संघटनांची कार्यपद्धती हॉकी किंवा हॉकीपटू यांच्या हिताची नाही, अशा शब्दांत वॉल्श यांनी ‘साई’वर टीका केली होती. मात्र मानधनाबाबत यापूर्वी वॉल्श यांनी तक्रार केली नव्हती, असे थॉमसन यांनी यावेळी स्पष्ट केले.
वॉल्श यांच्यासारख्यांची भारताला गरज
मुंबई– मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांचा मानधनाबाबतचा प्रश्न ‘साई’ने लवकर निकालात काढावा. कारण त्यांच्यासारख्या प्रशिक्षकांची भारताला गरज आहे, असे मत माजी मुख्य प्रशिक्षक क्लॅरेन्स लोबो यांनी बुधवारी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले.
‘‘वॉल्श यांच्या रूपाने भारताला चांगला प्रशिक्षक मिळाला आहे. वास्तविक पाहता त्यांनीही राजीनामा देण्यापूर्वी ‘साई’च्या महासंचालकांशी चर्चा करण्याची आवश्यकता होती. मात्र ‘झाले गेले’ विसरून वॉल्श यांना मुदतवाढ देताना भारताच्या हॉकीचा स्तर उंचावण्यादृष्टीने ‘साई’ आणि ‘हॉकी इंडिया’ने ठोस पावले उचलण्याची गरज आहे,’’ असे लोबो म्हणाले. परदेशी प्रशिक्षक चांगला की भारतीय, असे विचारले असता, ‘‘परदेशी प्रशिक्षक नियुक्तीची सध्या ‘फॅशन’ आहे. भारतात हॉकी नव्हे तर अन्य खेळांतही तेच दिसते. मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी समर्थपणे पेलणारे अनेक जण आपल्याकडे आहेत. मात्र भारतीय प्रशिक्षक लवकर समाधान मानतात. भारताच्या प्रशिक्षकांनी अधिकाधिक कोर्सेस करण्यासह स्वत:ची वेगळी ‘इमेज’ बनवायला हवी. तसे होत नाही,’’ असे लोबो यांनी सांगितले.