कोळसा वाटप गैरव्यवहार प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. परख यांना आरोपी या नात्याने सीबीआयच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे.
नवी दिल्ली- २००५ मध्ये कोळसा वाटप गैरव्यवहार प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. परख यांना मंगळवारी आरोपी या नात्याने सीबीआयच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. या सर्वांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायाालयाचे विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी ७३ पानांचा निकाल दिला आहे. तालबिरा-२ या कोळसा खाणीचे वाटप करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी या तिघांसह हिंदाल्कोचे वरिष्ठ अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी. भट्टाचार्य यांनाही आरोपी केले आहे. या कायद्याअंतर्गत कटकारस्थान, विश्वासघात, भ्रष्टाचार प्रतिबंधक आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या आदेशाने व्यथित
सीबीआय न्यायालयाने दिलेल्या आदेशाने आपण व्यथित झालो आहोत. मात्र, या खटल्यातून सत्य नक्कीच बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिली. या प्रकरणाची कायदेशीर छाननी व्हावी, अशी मागणी आपण कायम केलेली होती. या खटल्यामुळे माझी बाजू मांडायची संधी मला निश्चितपणे मिळेल. देशातील न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. माझे निर्दोषत्व नक्कीच सिद्ध होईल, असेही सिंग म्हणाले.