‘तारुण्य अबाधित ठेवण्यासाठी नेहमी मनाची श्रीमंती जपावी लागते. मनात प्रत्येकाबद्दल चांगला भाव असेल, तर तोच तुम्हाला कायम तारुण्य जपण्याची प्रेरणा देत असतो, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या चिरतारुण्याचे रहस्य उलगडले.
पुणे- ‘तारुण्य अबाधित ठेवण्यासाठी नेहमी मनाची श्रीमंती जपावी लागते. मनात प्रत्येकाबद्दल चांगला भाव असेल, तर तोच तुम्हाला कायम तारुण्य जपण्याची प्रेरणा देत असतो, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या चिरतारुण्याचे रहस्य उलगडले. निमित्त होते दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या वरदलक्ष्मी चित्र निर्मित ‘उमेद पुरस्कार सोहळ्याचे’..
अभिनेत्री अरुणा इराणी, अभिनेता अशोक सराफ, आदिनाथ कोठारे, अभिनेत्री श्रद्धा कपूर, श्रृती मराठे, निपसिसिदच्या उपाध्यक्षा उषा काकडे आदी या वेळी उपस्थित होते.
हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात पार पडला. अभिनेत्री अरुणा इराणी, श्रद्धा कपूर, श्रृती मराठे, अभिनेता अशोक सराफ, आदिनाथ कोठारे यांना आशा भोसले, उषा काकडे, महेश टिळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच ‘डान्स इंडिया डान्स’ या स्पध्रेत सहभाग घेतलेल्या बालकलाकारांचा व नृत्य दिग्दर्शकांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.
पत्रकारांशी संवाद साधतांना आशा भोसले म्हणाल्या की, अरुणा इराणी यांच्यासाठी गाणी गात असताना अभिनेत्रीचे हावभाव, तिची वेशभूषा, केशभूषा यांचा विचार करून त्या गीताला शब्दातून भाव देत होते. अरुणा इराणींनी साकारलेल्या विविध भूमिकांमुळे मी तिची खूप मोठी चाहती आहे. राजकारणा विषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, मला घरातील राजकारण सांभाळता आले नाही, तर मी देशातील राजकारण काय सांभाळणार. त्यामुळे राजकारणात न पडलेलेच बरे.
पुरस्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, ‘उमेद पुरस्कार’ हा आशादीदींच्या हस्ते मिळणार, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. लोक आमचे चाहते असतात. परंतु मी आशादीदींच्या गायकीचा चाहता आहे.’