लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील १ हजार ८०० शिक्षकांनी बनावट वैद्यकीय बिले सादर करून २२ कोटी रुपयांचा घोटाळा केला. याबाबत तीन महिन्यांपूर्वी समिती नेमूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
लातूर – लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील १ हजार ८०० शिक्षकांनी बनावट वैद्यकीय बिले सादर करून २२ कोटी रुपयांचा घोटाळा केला. याबाबत तीन महिन्यांपूर्वी समिती नेमूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधा-यांना धारेवर धरत विरोधकांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचा त्याग केला. समाजकल्याण सभापतींची मध्यस्थी आणि अध्यक्षांच्या आश्वासनानंतर अध्र्या तासांनी पुन्हा सर्व सदस्य सभागृहात आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा पाटील-कव्हेकर, समाजकल्याण सभापती बालाजी कांबळे, बांधकाम सभापती कल्याण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
येथील सुमारे १ हजार ८०० शिक्षकांनी बनावट वैद्यकीय बिले सादर करून २२ कोटींचा गैरव्यवहार केला होता. भाजपचे गटनेते रामचंद्र तिरुके यांनी ३ महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत हा प्रश्न मांडला होता. पण गेल्या ३ महिन्यांत यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने या सभेत पुन्हा तिरुके यांनी हा विषय उपस्थित केला. यावेळी त्यांनी बनावट वैद्यकीय बिलांचे काही पुरावेही आपल्या सोबत आणले होते. मात्र अध्यक्षांना हा विषय अधिवेशनातही चर्चिला गेला असून सरकारने याबाबत एक समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे दुसरी समिती गठीत करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आपल्या अखत्यारित चौकशी करू शकते, असे तिरुके यांनी सभागृहाला सांगितले. पण त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने विरोधकांनी सभात्याग केला आणि सभागृहाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. तर शिक्षण विभागातील प्रश्नांसाठी एक पाहणी पथक नियुक्त करण्यात येईल. बनावट वैद्यकीय बिलांबाबत असलेले पुरावे आपल्याकडे द्यावेत, सर्व पुरावे सरकारने नियुक्त केलेल्या समितीकडे देऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यास भाग पाडू आणि दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी दिले. यानंतर विरोधकांनी आंदोलन मागे घेतले.