घरकामासाठी बाई किंवा मदतीला कोणी गडी मिळणं हे हमखास डोकेदुखीचं काम.. शिवाय घरातलं काम खोळंबून राहतं ते वेगळंच. घर म्हटलं की असंख्य कामांसाठी कामवाल्या बायकांची, तज्ज्ञांची गरज लागत असते. कधी घरकामासाठी नोकर लागतात तर कधी फर्निचर बनवण्यासाठी सुताराची गरज लागते, मग अशा कामांसाठी संबंधित माणसांची शोधाशोध सुरू होते. कित्येकदा कॉर्पोरेट कंपन्या व बांधकाम-गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांनाही काही विशिष्ट कामांसाठी कुशल कामगारांची गरज लागते, पण या असंघटित कामगारांची माहिती कधी एकत्र उपलब्ध नसते, मात्र ती आता ‘नॅनोजॉब्ज’ या वेबसाइटवर मिळू शकेल.
डोंबिवली, ठाणे, कल्याण, कळवा, भिवंडी इथल्या काही नाक्यांवर सकाळी एक चक्कर मारली तर शेकडो कामगार अक्षरश: रस्त्यावर बसलेले दिसतात. हे सर्व कामगार असतात गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडित व अशा प्रकारे सकाळी नाक्यावर जमून कामाची वाट पाहणं हा या कामगारांचा शिरस्ता. गृहनिर्माण क्षेत्रात गवंडी, वेल्डर, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन्स, ड्राफ्टस्मन, रंगारी इत्यादी कामांसाठी नेहमीच तंत्रकुशल कामगारांची गरज लागत असते व अनेकदा त्यांची चणचणही भासत असते. परंतु नाक्यावर जमणा-या व हातावर पोट असणा-या या कामगारांना रोजच खिसा भरणारं काम मिळेलच असंही नसतं. साधारण दुपारी अकरा-बारा वाजेपर्यंत त्यांना काम मिळतंय की नाही याची वाट पाहत ताटकळत राहावं लागतं. उन्हा-पावसातही कामासाठी रस्त्यावर वाट पाहत बसणा-या या कुशल कामगारांच्या मदतीला ‘नॅनोजॉब्ज’ धावून आली आहे.
बरेचदा अशिक्षित असल्यामुळे या कामगारांकडे कौशल्य असूनही त्यांना नोकरी शोधण्यात अडचणी येतात. त्यातून जॉब पोर्टलवर नोकरी शोधणं हा प्रकार चतुर्थश्रेणी कामगारांसाठी कठीण व सर्वस्वी नवीनदेखील आहे व अद्याप कोणीही अशा प्रकारच्या कामगारांसाठी असा प्रयत्न केलेला नाही. विकास चौधुरी व अनुपम सिन्हल यांनी एंट्री लेव्हलपेक्षाही कमी स्तरातील काम करणा-या अशा या कामगारांना नोकरी मिळवून देण्याचा विचार केला. त्यांच्या प्रयत्नातून ‘नॅनोजॉब्ज’ ही कंपनी व कंपनीची वेबसाइट सुरू झाली आहे पण याचं वैशिष्टय़ म्हणजे अशिक्षित कामगारांनी वेबसाइटवर जाऊन नोंद करण्याची गरज नाही. तर एका नंबरवर फक्त मिस कॉल दिल्यानंतर कंपनीच्या कॉलसेंटरवरून त्यांची माहिती घेतली जाईल.
‘नॅनोजॉब्ज’चं वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे प्रतिनिधी स्वत: शहरातील अनेक भागात फिरून तिथली किराणामालाची दुकानं, मोबाइल स्टोअर्स, पान शॉप, ज्युस सेंटर्स, वडापावच्या गाडय़ा इत्यादी ठिकाणी जाऊन कामगारांची माहिती गोळा करणार आहेत. अशा ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी हजर राहून एक फॉर्म भरून घेणार आहे. इतकंच नाही तर गणेशोत्सव, नवरात्र अशा सणांमध्ये सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा केली जाते. अशा रितीने नॅनोजॉब्जकडे असंख्य कामगारांचा डाटा उपलब्ध असणार आहे.
सध्या कामगारांशी प्रत्यक्ष बोलून मुंबईच्या मध्य, पश्चिम व इतर उपनगरांतून माहिती गोळा केली जाणार आहे, असं ‘नॅनोजॉब्ज’चे एक संस्थापक अनुपम सिन्हल यांनी सांगितलं. हा डाटा वेबसाइटवरही टाकला जाईल.
मात्र नोकरी शोधण्यासाठी या कामगारांना वेबसाइट पाहण्याची गरज नाही तर त्यांना ‘नॅनोजॉब्ज’चे प्रतिनिधी फोन करून नोकरीसंबंधी माहिती देतील. नॅनोजॉब्ज कामगारांची माहिती गोळा करण्याशिवाय प्रत्यक्ष कंपन्यांशीदेखील संपर्कात राहणार आहे. जेणेकरून अशिक्षित कामगारांनाही नोकरीच्या संधींबाबत माहिती मिळत राहील. विशेष म्हणजे, चतुर्थश्रेणी कामगारांना विनाशुल्क नोकरी मिळणार आहे. नॅनोजॉब्जकडे शंभर प्रकारातील नोक-या उपलब्ध आहेत. २०१२ साली सुरू झालेल्या नॅनोजॉब्सकडून आतापर्यंत सुमारे अठरा हजार जणांना नोकरी मिळालीय, असा कंपनीचा दावा आहे. सुमारे पाच लाख इच्छुकांनी नोकरीसाठी नोंदणी केलेली आहे. कंपनीने दिलेल्या ०७३०३४४०५५० या क्रमांकावर मिसकॉल दिल्यास त्यांच्याकडून फोन येईल व नोकरीसंबंधीचा अर्ज स्वीकारला जाईल. ज्यांना अशा घरासंबंधीच्या कामांसाठी माणसं पाहिजे असतील त्यांना मात्र वेबसाइटवर जाऊन एक ठरावीक पॅकेज घ्यावं लागेल, त्यानंतरच संबंधित वर्गातील कामगारांची माहिती त्यांना उपलब्ध होईल.
ऐनवेळी अडचणीत टाकणा-या तरीही महत्त्वाच्या असणा-या घरातील या छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी कुशल कामगार उपलब्ध करून देण्याची सोय ‘नॅनोजॉब्ज’ने केली आहे. तेव्हा ‘नॅनोजॉब्ज’कडे विचारणा केल्यास तुम्हाला घरासाठी नोकर, फिटर्स, इलेक्ट्रिशिअन, प्लंबर, गवंडी इत्यादी प्रकारामधील कामगार आरामात मिळू शकतील.