पेडणे तालुक्यातील पण भौगोलिकदृष्टया महाराष्ट्राशी जोडलेल्या तेरेखोल येथील गोमंतकीयांचा ‘वनवास’ आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
पणजी– पेडणे तालुक्यातील पण भौगोलिकदृष्टया महाराष्ट्राशी जोडलेल्या तेरेखोल येथील गोमंतकीयांचा ‘वनवास’ आता सुटण्याच्या मार्गावर आहे. तेरेखोल आणि केरी या गोव्यातीलच दोन्ही गावांमधील तेरेखोल नदीवर पुलाची सोय नसल्यामुळे तेरेखोलवासीयांना फार हाल सहन करावे लागत होते. त्यांचे हे हाल या नदीवरील पुलाने दूर होणार आहे. गोवा सरकारने सुमारे ७२ कोटी रुपये खर्च करून केरी-तेरेखोल या दरम्यान पूल बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या पुलाचा शिलान्यास २५ फेब्रुवारी रोजी स्थानिक आमदार आणि गोव्याचे आरोग्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पास्रेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी पास्रेकर यांनी विरोधी पक्षात असताना आणि सत्तेत असतानाही जोरदार आवाज उठवला होता. त्यांच्याच पुढाकाराने हा पूल आता साकारत आहे. तेरेखोल हा गोव्याच्या भाग असून तेथे अवघीच काही कुटुंबे राहतात. त्यात ख्रिस्ती समाजाचाच अधिक समावेश आहे.
या सर्वाना गोव्यात येण्यासाठी नदी ओलांडावी लागते. या नदीवर फेरीसेवा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी ही फेरीसेवा अनियमित असते. त्यामुळे विशेषत: शिक्षणासाठी केरी येथे ये-जा करणारे विद्यार्थी, वैद्यकीय इलाजासाठी गोव्यात येणारे रुग्ण, नोकरी करणा-या महिला यांना फारच त्रासदायक होते. अनेक वेळा नदीला ओहोटी असल्यास फेरीबोट सेवा दिवसच्या दिवस बंद होत असते. अशा परिस्थितीत या नदीवर पुलाची अत्यंत निकड होती. तेरेखोल हे एक आकर्षक पर्यटनस्थळ असल्याने या नियोजित पुलामुळे पर्यटनालाही चालना मिळू शकेल असा विश्वास स्थानिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.