तेलंगणामधील मेडकमध्ये अयुथा चंडी महायज्ञावेळी एका मंडपाला रविवारी दुपारी आग लागली.
मेडक (तेलंगणा)- तेलंगणामधील मेडकमध्ये अयुथा चंडी महायज्ञावेळी एका मंडपाला रविवारी दुपारी आग लागली. बांबू आणि गवतापासून मांडव बांधण्यात आल्यामुळे आग पटकन पसरली. मात्र ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या फार्महाऊसवर वैश्विक कल्याण आणि शांतीसाठी २३ डिसेंबरपासून पाच दिवसांसाठी या यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञावर सात कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी या यज्ञाला उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे या महायज्ञासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज येणार होते. मात्र आगीची बातमी समजताच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर हैदराबादकडे वळवण्यात आले. तसेच महायज्ञही काही काळासाठी स्थगित करण्यात आला.
तेलंगण, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूतील जवळपास दोन हजार भटजी या यज्ञामध्ये सहभागी झाले आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सकाळी या यज्ञासाठी आले होते.