पाषाण माळरानावर आढळणारा दुर्मीळ ‘क्रेस्टेड बंटिंग’ हा पक्षी सावंगी परिसरातील टेकडीवर आढळला आहे.
वर्धा- पाषाण माळरानावर आढळणारा दुर्मीळ ‘क्रेस्टेड बंटिंग’ हा पक्षी सावंगी परिसरातील टेकडीवर आढळला आहे. ‘क्रेस्टेड बंटिंग’ हा पक्षी प्रथमच विदर्भात दिसला असल्याची माहिती पक्षीमित्र किशोर वानखडे यांनी दिली.
वर्ध्यातील सावंगी टेकडीवर पक्षीनिरीक्षक किशोर वानखडे व पार्थ विरखडे यांना एक वेगळाच पक्षी आढळून आला. या पक्षाचा रंग काळा असून त्याचे पंख विटकरी रंगाचे होते. जवळपास मैनेच्या आकाराचा असलेल्या या पक्षाच्या डोक्यावर टोकदार तुरा आहे. हा पक्षी एक ते दीड मिनिट इतकाच वेळ दिसला. पण या वेळेत किशोर वानखडे यांनी या पक्षाला कॅमेराबद्ध करण्यात यश मिळविले आहे. त्यानंतर पक्षीकोषाच्या आधारे हा पक्षी ‘क्रेस्टेड बंटिंग’ असल्याचे दिलीप विरखडे व किशोर वानखडे यांनी सांगितले.
‘क्रेस्टेड बंटिंग’ हा पक्षी विदर्भात आढळल्याची आजवर नोंद नाही. ‘बर्डस् ऑफ इंडियन सबकॉन्टिनंट’च्या ताज्या आवृत्तीमध्ये दिलेल्या पक्षी नकाशामध्ये ही बाब स्पष्टपणे दिसून येते. म्हणून ‘क्रेस्टेड बंटिंग’ या पक्षाला वध्रेच्या नकाशावर आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू अशी माहिती पक्षीमित्र किशोर वानखडे, दिलीप विरखडे, प्रभाकर पुसदकर, सुभाष मुडे, जयंत सबाने, अविनाश भोळे, रवींद्र पाटील यांनी दिली.