भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये आज जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात योगदिनाचा उत्साह दिसून येत आहे.
नवी दिल्ली – भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये आज जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात योगदिनाचा उत्साह दिसून येत आहे.
राजधानी दिल्लीतील राजपथावर भव्यदिव्य स्वरुपात योग दिनाचा सोहळा पार पडला. यावेळी राजपथाचे रुपांतर योगपथात झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजपथावर योगासने करण्यात आली. मोदींनीही ३० मिनिटे योगासने केली. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल नजीब जंग, अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राजपथावर योगदिन सोहळ्यात सुमारे ३५ हजार लोकांनी भाग घेतला होता. सियाचीनमध्येही लष्करी जवानांनी योगदिनाच्या निमित्ताने योगसाधना केली. देशातील अनेक राज्यांमध्ये योगदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर येथे आयोजित योगसोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्य उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, नागपूरचे महापौर प्रवीण दटके ही नेतेमंडळी उपस्थित होती.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाला मंजुरी देण्यात आली होती. १७७ देशांनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे ठरवले होते.
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या योगदिन सोहळ्यात सहभाग घेतला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊ येते योगदिन सोहळ्यात सहभाग घेतला होता. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही दिवसाची योगदिनाने केली. मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी नागरिकांसह योगा करत योगदिन साजरा केला.