मुले म्हणजे सतत लुकलुकणारे तारे आहेत. मात्र पालकांच्या अपेक्षांच्या धुक्यात ते तारे गडप झालेले असतात. त्यांनी व्यक्त व्हावे, मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी; पालकांनी त्यात जाणीवपूर्वक लक्ष द्यावे या उद्देशाने गोदरेज समूहाच्या गोदरेज आर्चिव्स (Godrej Archives)या विभागाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साडेतीन तासांचा हा कार्यक्रम मुंबईतील विक्रोळीस्थित ‘गोदरेज अॅण्ड बॉइस’ फॅक्टरी आवारातील सुसज्ज सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमात ‘धुक्यात हरवलेले लाल तारे’ हा माहितीपट दाखवला गेला. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्माण हे प्रसाद देशपांडे, निखिल राणे, देवदत्त राजाध्यक्ष या त्रयींनी केले आहे.
सत्तर-ऐंशीच्या दशकातील सोव्हिएत रशियातील बालसाहित्य आणि त्या पुस्तकांच्या मराठी आवृत्त्या; पुस्तकातील गोष्टी, चित्रे, सजावट याबाबतच्या आठवणींना माहितीपटात उजाळा मिळाला आहे. यात मुंबई-महाराष्ट्रातील लेखक, साहित्यिक, प्रकाशक, अभ्यासक, वाचक आणि मान्यवरांच्या प्रतिक्रिया समाविष्ट आहेत. अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘बोक्या सातबंडे’ या त्यांच्या पुस्तकाच्या आतापर्यंत अठरा आवृत्या निघाल्याचे सांगितले. हे पुस्तक आजही मुले आवडीने वाचत आहेत, असे ते म्हणाले. या माहितीपटानंतर मराठीतील लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांची मुलाखत घेतली गेली.
जर्मन भाषातज्ज्ञ, संस्कृतच्या अभ्यासिका, गॉएथे इन्स्टिटय़ूटच्या संचालिका, कवयित्री जयश्री हरी जोशी यांनी ही मुलाखत घेतली. रत्नाकर मतकरी यांनी त्यांच्या मुलाखतीत बालसाहित्य, बालनाटय़ यावर भाष्य केले. मुलांची निरीक्षणशक्ती प्रचंड असते. त्यातून त्यांना कलेद्वारे व्यक्त होण्यास, लिहिण्यास प्रवृत्त करावे या मुद्दय़ांवर त्यांनी भर दिला. मुलांमधील उत्स्फूर्तता, बालनाटय़ बसवतानाच्या काही गमती जमतीही त्यांनी सांगितल्या. या मुलाखतीनंतर एक चर्चासत्र घडवून आणले गेले. या चर्चासत्रात संध्या टाकसळे (प्रकाशिका – प्रथम प्रकाशन), मार्गी शास्त्री (संचालिका – भारतीय भाषा साहित्य संस्थान), डॉ. मोनिका खन्ना (लेखिका प्राध्यापिका – इंदिरा इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट), तेजस्विनी मोडक (रशियन भाषातज्ज्ञ) या मान्यवरांनी सहभाग घेतला.
मुलांची मानसिकता, मुलांमधील बदलत्या वाचनसवयी, मौखिक गोष्टींचे कथन-श्रवण, पुस्तकांचा प्रसार, ग्रामीण भागात पुस्तकांची उपलब्धता, पुस्तकांच्या किमती, पुस्तकांची सजावट, बालजगतात प्रसारमाध्यमांचा शिरकाव, बालसाहित्याचे मूल्यांकन या बाबींवर चर्चासत्रात ऊहापोह झाला. या सबंध कार्यक्रमात काही प्रेक्षकांनी आपल्या पाल्यांनाही सोबत आणले होते. शिवाय गोदरेज समूहाच्या उदयांचल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचीही उपस्थिती कार्यक्रमाच्या प्रेक्षकवर्गात दिसत होती.
बालसाहित्यविषयक जुन्या सोव्हिएत प्रकाशन पुस्तकांचे प्रदर्शन सभागृहाबाहेर भरवले होते. काही पुस्तके विक्रीसाठीही ठेवली होती. हा कार्यक्रम नि:शुल्क आणि सर्वांसाठी खुला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी सभागृहाची रचना आणि आपत्कालीन स्थितीत सुरक्षित बाहेर पडण्यासाठी आखलेली सुरक्षा व्यवस्था, त्याचा आरखडा इत्यादींची तपशीलवार माहिती सभागृह मंचावरील पडद्यावर प्रेक्षकांना करून देण्यात आली होती. गोदरेज व्यवस्थापन आणि कार्यक्रम आयोजनातील हे एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल.