अधिका-यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी या प्रकरणात भ्रष्टाचार करणा-यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई- मुंबईतील नालेसफाईतील कामांमध्ये झालेल्या घोटाळयासंदर्भात दोषी ठरवलेल्या कंत्राटदार आणि अधिका-यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी या प्रकरणात भ्रष्टाचार करणा-यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याप्रमाणे महापालिकेची फसवणूक करणा-या आकाश इंजिनीअरिंग, आर.ई.इन्फ्रा आणि नरेश ट्रेडर्स या तीन कंत्राटदारांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तर प्रमुख अभियंता (दक्षता) यांच्यासह पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या १४ दुय्यम, सहायक अभियंता आणि मुकादम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
महापालिकेच्या वतीने २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षासाठी २८५ कोटींच्या छोटया व मोठया नालेसफाईचे कंत्राट दिले होते. यात मोठया नाल्यांच्या सफाईसाठी ३२ कामे दिली होती. परंतु ही नालेसफाई योग्यप्रकारे होत नसल्याचे आरोप झाल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त (घनकचरा) प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. तिने
३१ ऑगस्ट रोजी आयुक्तांना अहवाल सादर केला. यात त्यांनी ९ कंत्राट कामांमधील कंत्राटदारांसह गाळाची विल्हेवाट लावण्यात येणारी डम्पिंग ग्राऊंड, गाळ वाहून नेणारी वाहने, त्यावर देखरेख ठेवणारी व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हिटीएस), गाळ वजन माप करणारी कंपनी आदींसह कर्मचा-यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला होता.
ही कागदपत्रे ताब्यात घेऊन याची सखोल चौकशीचे निर्देश आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना दिले होते. त्यांनी अंतिम चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर केला. त्यामुळे त्यांनी ‘व्हिटीस’कंत्राटदार, वजनकाटा कंत्राटदार आणि नालेसफाई कंत्राटदार यांनी संगनमताने खोटा रेकॉर्ड तयार करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप ठेवला.
त्यामुळे ९ कंत्राट कामांपैकी आकाश इंजिनिअरिंग कन्स्लटंट, आर.ई इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि नरेश ट्रेडर्स या तीन प्रमुख कंत्राटदारांसोबत मेसर्स फ्लेक्सीटेक प्रायव्हेट लिमिटेड, वजनकाटा कंत्राटदार लकी वे ब्रिज, मेसर्स साईराज फुल्ली कॉम्प्युटराईज वे ब्रिज, देवनार वे ब्रिज या कंत्राटदारांनाही या फसवणुकीत सहभाग करून घेत या सर्वाविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाची चौकशी करून पोलीस हे फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
प्रमुख अभियंता (दक्षता) उदय मुरुडकर निलंबित
देशमुख समितीने प्रमुख अभियंता (दक्षता) यांनी मोठया कंत्राटावर कोणतेही नियंत्रण ठेवले नसल्याचे म्हटले आहे. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येवूनही किंवा स्थायी समिती व अन्य ठिकाणी चर्चा होतानाही त्यांनी या कामांची दखल घेतली नाही.
तसेच त्यांच्या हाताखालील कर्मचा-यांनी कोणती तपासणी केल्याची खात्री केली नाही. स्वत:हून प्रत्यक्ष कामांच्या पाहणी केली नाही. त्यामुळे अपेक्षित कर्तव्य बजावण्यात ते असमर्थ ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे.
१३ अभियंता आणि मुकादम निलंबित
या चौकशीत ३ मुकादम तथा जलनि:सारण सहायक, ६ दुय्यम अभियंता आणि ४ सहायक अभियंता हे सकृतदर्शनी दोषी आढळले. त्यामुळे या सर्वाना निलंबित करण्याची शिफारस समितीने केली होती. त्याला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजुरी दिल्यामुळे प्रमुख अभियंते (दक्षता) उदय मुरुडकर यांच्यासह १४ अभियंते व मुकादम यांना निलंबित केले.
या सर्वाची खात्यांतर्गत चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,असे बोलले जात आहे. सर्व नाल्यांचे कंत्राट कामांचे पैसे रोखून ठेवले सर्व मोठया नाल्यांसंबंधी नालेसफाई कंत्राट कामांचे पैसे देण्यात येणार नसून ते रोखून ठेवण्यात आल्याचे संजय देशमुख यांनी म्हटले आहे.