दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती आणि नव्या कामांची जबाबदारी स्वीकारत आमदार नितेश राणे यांनी गावभेट कार्यक्रमात ग्रामस्थांचे समाधान केले.
कणकवली- दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती आणि नव्या कामांची जबाबदारी स्वीकारत आमदार नितेश राणे यांनी गावभेट कार्यक्रमात ग्रामस्थांचे समाधान केले. ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.
यापूर्वी दिलेला शब्द जसा मी पाळला तसाच प्रत्येक शब्द पाळेन आणि गावात सर्वाच्या सहयोगातून विकासगंगा आणेन. गावातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रसंगी सरकारकडून विकासनिधी खेचून आणेन. या मतदार संघाचा मी आमदार आहे. तुमचा प्रतिनिधी आहे.
कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवा आणि तुम्ही निश्चिंत व्हा, असा विश्वासाचा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला. यापूर्वी झालेल्या विकासकामांतून नितेश राणे यांनी वचनपूर्ती केल्याने आमच्या आणखीनच अपेक्षा वाढल्या असल्याचे गौरवोद्गार बुजुर्ग मंडळींनी कोढले.
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील चिंचवली, खारेपाटण टाकेवाडी, वायंगणी, नडगिवे, शेर्पे या गावांमध्ये नितेश राणे यांनी गावभेट कार्यक्रम घेतला. स्थानिकांशी थेट संवाद साधला.
खारेपाटण टाकेवाडीला जोडणारा रस्ता या आर्थिक वर्षात पूर्ण करून देणार, टाकेवाडी काजीवाडी नळयोजना सुरू करू, रामेश्वरनगर येथील प्राथमिक शाळा निर्लेखित करून नव्याने बांधण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि मी असे सार्वत्रिक प्रयत्न केले जातील.
काळभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता आणि शाळा, पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ताही टप्प्याटप्प्याने पूर्ण करू, असे आश्वासनही राणे यांनी खारेपाटण येथील गावभेटीदरम्यान दिले. वायंगणी येथील नदीतील गाळ तातडीने उपसा करून दिला जाईल तर शेर्पे राणेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्ण केला जाईल, नडगिवे येथील समस्या अग्रक्रमाने सोडवल्या जातील, असे आश्वासन यावेळी गावांतील बैठकांदरम्यान त्यांनी दिले.