न्यूझीलंडला सोमवारी ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.
वेलिंग्टन – न्यूझीलंडला सोमवारी ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्याने काही ठिकाणी खिडक्यांच्या काचा फुटल्या मात्र कुठेही जिवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.५२ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला. वेलिंग्टन पासून ११५ कि.मी. अंतरावर असलेली उत्तर न्यूझीलंडमधील शहरे या भूकंपाच्या धक्क्याने हादरली. उत्तर न्यूझीलंडमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
वित्तहानी झाली नसली तरी, काही इमारतीचा पाया खचल्याचे पोलिसांनी सांगितले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे वेलिंग्टनमधील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. २०११ मध्ये दक्षिण न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात आलेल्या भूकंपात १८५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौ-यावर आहे. त्याआधी १८५५ मध्ये वेलिंग्टनमध्ये मोठा भूकंप झाला होता.