कुडाळ तालुक्यातील पडवे गावात ३०० कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्यात येत आहे.
पडवे – कुडाळ तालुक्यातील पडवे गावात ३०० कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्यात येत आहे. यासाठी मुंबईतील प्रख्यात लीलावती हॉस्पीटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात येत असून; जर्मन व जपान या प्रगत देशांतील अत्याधुनिक वैद्यकिय मशिनरीज् या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोकणासह देश-परदेशातील रुग्णही उपचारासाठी येतील. या दृष्टीने अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा आणि उच्च दर्जाच्या शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.
भविष्यात पडवे गाव आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मार्ट शहर निर्माण होईल. या सर्वासाठी ज्या-ज्या सुविधा निर्माण कराव्या लागतील; त्या निर्माण कराव्या लागतील. त्याते मी व माझे कुटुंबीय कुठेही कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पडवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या स्नेहमेळय़ात दिली.
सौ. निलम राणे अध्यक्ष असलेल्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पडवे येथे ८० एकर क्षेत्रात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आत्याधुनिक सोयीसुविधा असलेले ७५० खाटांचे रुग्णालय व देशातीलच नव्हे; तर परदेशातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येतील, अशा प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू आहे. एप्रिल २०१६ पासून पडवे येथे अत्याधुनिक सुविधा असलेले हे हॉस्पिटल सुरू होईल. जून-जुलै २०१६पासून मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. ८० एकरातील विस्तीर्ण माळरानावर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती उभ्या राहत असल्याने पडवे गावचे रूप पालटले आहे.
या ठिकाणी रुग्णालय उभारणीसाठी पडवे पंचक्रोशीतील ज्या-ज्या ग्रामस्थांनी जमिनी देऊन सहकार्य केले; त्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देण्यासाठी तसेच त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी, या ठिकाणी कशी स्मार्ट सिटी निर्माण होणार आहे आणि लोकांच्या जीवनात आर्थिक क्रांती कशी होणार आहे, याची वस्तुस्थिती कळावी, या उदात्त हेतूने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या स्नेहमेळय़ाचे आयोजन केले होते.
भविष्यात निर्माण होणा-या रोजगाराच्या, पिण्याच्या पाण्याच्या, रस्त्याच्या व अन्य सर्व सोयीसुविधा व मागण्याही त्यांनी मान्य केल्या. ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसनही केले. त्यामुळे उपस्थित सर्व ग्रामस्थांनीही राणे यांना धन्यवाद दिले. प्रारंभी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतिश सावंत, डॉ. विलास सावंत यांची भाषणे झाली. या प्रसंगी कॅप्टन डी. व्ही. परब, शाम परब, पडवे सरपंच प्रभाकर गोसावी, नीलिमा पारकर, बळीराम परब, धाकू परब तसेच पडवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.