पाकिस्तानला मंगळवारी (२ ऑक्टोबर) टी-२० वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठण्यासाठी बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे.
कोलंबो- पाकिस्तानला मंगळवारी (२ ऑक्टोबर) टी-२० वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठण्यासाठी बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. त्याचवेळी त्यांना भारताच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. भारताविरुद्ध पाकिस्तान सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेला दिसला. त्याउलट ऑस्ट्रेलियाने सलग चार सामने जिंकून स्पर्धेत दबदबा राखला आहे. सलग चारही सामन्यांत ‘सामनावीर’ ठरलेला अष्टपैलू शेन वॉटसनला वेळीच आवर घालण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर आहे.
भारताविरुद्ध पाकिस्तानचे अव्वल तीन फलंदाज ‘फ्लॉप’ ठरले. इम्रान नाझीर, नासीर जामशेद आणि मोहम्मद हाफीझ यांना वेळीच फॉर्म गवसण्याची अपेक्षा पाकिस्तानला आहे. गोलंदाजांमध्ये उमर गुल, सइद अजमल, शाहिद आफ्रिदी आणि यासिर अराफत यांनादेखील सातत्य राखण्यात अपयश येत आहे. युवा फलंदाज उमर अकमल आणि यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल यांच्यावरही पाकिस्तानची भिस्त आहे.
दुसरीकडे, शेन वॉटसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आतापर्यंत ऑस्ट्रेलिया अजिंक्य राहिला आहे. सुपर-८मधील दोन्ही लढती जिंकण्यात त्यांना यश आले आहे.
पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांना दुस-या ग्रूपमध्ये अव्वल स्थान मिळवता येईल. ते पाहता पुन्हा वॉटसनवर ऑस्ट्रेलियाची मदार आहे. जोडीला डेव्हिड वॉर्नर आणि माइक हसी हे धडाकेबाज फलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना अजून विशेष संधी मिळालेली नाही.
गोलंदाजी हीदेखील ऑस्ट्रेलियाची ताकद आहे. झेवियर डोहार्टी, मिचेल स्टार्क आणि शेन वॉटसन हे वेगवान गोलंदाज प्रभावी ठरत आहेत. ते पाहता ऑस्ट्रेलियाला नमवणे हे पाकिस्तानसाठी खडतर आव्हान वाटते.
वेळ : दु. ३:३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट.
वॉटसन सर्वोत्तम
यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये शेन वॉटसन हा आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स आणि सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. ३१ वर्षीय वॉटसनने चार सामन्यांत १० विकेट्स घेताना २३४ धावा फटकवल्या आहेत.