ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅटट्रिकमुळे रेआल माद्रिदने रविवारी स्पॅनिश ला-लिगामध्ये डिपरेटिवो ला कोरुनाचा ५-१ने दणदणीत पराभव केला.
माद्रिद- ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅटट्रिकमुळे रेआल माद्रिदने रविवारी स्पॅनिश ला-लिगामध्ये डिपरेटिवो ला कोरुनाचा ५-१ने दणदणीत पराभव केला. या विजयाबरोबरच रेआल माद्रिदने १० गुणांसह सहाव्या स्थानी मजल मारत अव्वल प्रतिस्पर्धी बार्सिलोनाला (१८ गुण) सावध केले आहे. रेआलचा हा सलग दुसरा विजय ठरला. तसेच येत्या रविवारी होणा-या ‘एल-क्लासिको’ (बार्सिलोनाविरुद्धची लढत) लढतीपूर्वी रेआल माद्रिदने फॉर्म मिळवला आहे.
डिपरेटिवोच्या रिकीने १६व्या मिनिटालाच गोल करत यजमानांना हादरवले. मात्र २३व्या मिनिटाला पेनल्टीच्या संधीवर रोनाल्डोने रेआलला बरोबरी साधून दिली. डिपरेटिवोच्या मॅन्युअल पॅबियोचा धक्का लागल्याने डी मारिया पडला. त्यावर रेआलला ही पेनल्टी मिळाली. डी मारियाने नंतर फॉर्म दाखवत ३८व्या मिनिटाला रेआलसाठी दुसरा गोल नोंदवला. त्यापाठोपाठ रोनाल्डोने ४४व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे यजमानांना ३-१ने वर्चस्व राखता आले. हेडरद्वारे रोनाल्डोने हा गोल केला. दुस-या सत्रात झाबी अलोन्सोकडून मिळालेल्या पासवर पेपेने ६५व्या मिनिटाला रेआलसाठी चौथा गोल केला. रेआलचा विजय निश्चित दिसत असताना पुन्हा ८३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर रोनाल्डोने संघासाठी ‘हॅटट्रिक’ करणारा गोल केला.