पुणे-नाशिक महामार्गावर बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चारजण जागीच ठार झाले तर अन्य पाचजण जखमी आहेत.
पुणे- पुणे-नाशिक महामार्गावर बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चारजण जागीच ठार झाले तर अन्य पाचजण जखमी आहेत. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
जयसिंग तुकाराम सोळंके (२२), राकेश रामानंद पाटील (२५), नीरजकुमार धनेश्वर सिंग (२४) आणि एक अनोळखी व्यक्ती असे चौघेजण या अपघातात ठार झाले.
पुण्यातील चाकण जवळ मेदनकरवाडी परिसरात बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चाकण एमआयडीसीतील एका कंपनीच्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली. बसमधील कंपनीचे कर्मचारी तिस-या शिफ्टसाठी निघाले असताना हा अपघात झाला.
ठार झालेले चौघेजण अपघातस्थळी रस्त्यावर उभे होते. रस्त्यालगत थांबलेल्या बसला पाठीमागून आलेला ट्रक आदळला. त्यामुळे संबंधित वाहनांखाली हे चौघेही चिरडले गेले. तर बसमधील पाचजण जखमी झाले. जखमींच्या पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.