राज्यसेवा पूर्व परीक्षा १८ मे रोजी होणार असल्याने पुणे विद्यापीठाने १८ मे रोजी होणारी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलली आहे.
पुणे– राज्यसेवा पूर्व परीक्षा १८ मे रोजी होणार असल्याने पुणे विद्यापीठाने १८ मे रोजी होणारी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली.
अनेक अडथळ्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा १८ मे रोजी होणार आहे. मात्र, याच दिवशी पुणे विद्यापीठाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचेही काही पेपर होते. त्यामुळे हे दोन्ही पेपर एकाच दिवशी असल्याने पेपर द्यायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता.
मात्र, आता १८ मे रोजीचा पेपर विद्यापीठाने पुढे ढकलला असल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षेबरोबरच राज्यसेवा पूर्व परीक्षाही देता येणार आहे. पुढे ढकललेल्या पेपरची तारीख नंतर संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे कुलगुरु डॉ. गाडे यांनी सांगितले.