हिंजवडी परिसरातील इन्फोसिस कंपनीच्या कॅम्पसमधील कँटिनमध्ये काम करणा-या एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पुणे- हिंजवडी परिसरातील इन्फोसिस कंपनीच्या कॅम्पसमधील कँटिनमध्ये काम करणा-या एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या महिलेवर रविवारी बलात्कार करण्यात आला. दोन आरोपींपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला व दुस-याने त्यांची छायाचित्रे काढली होती. या दोघांकडून तिला धमकाविण्यात येत होते. अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पुरुषोत्तम सुभाष बाघ (२१) व प्रकाश किसन महाडीक (३०) या नराधमांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली असून, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीड़ित महिला ही हिंजवडी आयटी पार्क येथील कँटिनमध्ये काम करते. रविवारी ती कंपनीच्या वॉशरूममध्ये गेली असता आरोपी पुरुषोत्तम हा तिच्या मागे मागे वॉशरूममध्ये गेला व त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
यावेळी त्याचा मित्र प्रकाश याने आपल्या मोबाईलवर या घटनेचे फोटो काढले. तसेच या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली तर हे फोटो इंटरनेटवर टाकून बदनामी करू, अशी धमकी त्यांनी दिली होती.
या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने दुसर्या दिवशी हिंजवडी पोलिसांकडे या घटनेची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.