हिंदू लोकवस्ती असलेल्या भागातून मुस्लिम कुटुंबाला बाहेर काढा असे चिथावणीखोर वक्तव्य करणारे विश्वहिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडिया यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भावनगर – हिंदू लोकवस्ती असलेल्या भागातून मुस्लिम कुटुंबाला बाहेर काढा असे चिथावणीखोर वक्तव्य करणारे विश्वहिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडिया यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानंतर भावनगर जिल्हा प्रशासनाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
आम्ही तोगाडिया यांच्या भावनगर येथील वक्तव्याची चौकशी केल्यानंतर भावनगर जिल्हा प्रशासनाला तोगाडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असे गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी अनिता कारवाल यांनी सांगितले. तोगाडिया यांनी आपल्यावरील आरोप फेटाळला आहे. मी असे कोणतेही चिथावणीखोर वक्तव्य केलेले नाही असे तोगाडियांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राम माधव यांनी तोगाडियांचे समर्थन केले आहे. प्रवीण तोगाडिया यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही. ही एक बनवलेली बातमी आहे असे राम माधव यांनी टि्वटरवर म्हटले आहे. दरम्यान प्रवीण तोगाडिया यांच्या विधानावर सर्वच पक्षांनी जोरादार टीका केली आहे.